मतदार यादीत मतदारांचा मोबाईल क्रमांक जोडणार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभेची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असून मतदार यादी अद्ययावत करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाअंतर्गत पात्र नव मतदारांना आपल्या नावाची नोंदणी करता येणार आहे. तसेच आधीच मतदार असलेल्यांसाठी मतदार यादीतील आपल्या तपशीलामध्ये बदल, दुरुस्त्या, अद्ययावतीकरण करण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. यावेळी मतदारांनी मतदार यादीतील आपल्या नावासोबतच स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक देखील जोडण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राज्यात यावर्षीच्या दुसऱ्या विशेष संक्षित पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे. यात मतदारांसाठी दावे आणि हरकतींसाठी २० ऑगस्ट २०२४ पर्यंतचा कालावधी निश्चित केला आहे. मतदार यादीतील नावाबाबतची माहिती अद्ययावत करण्याबरोबरच यंदा मोबाइल क्रमांक जोडण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. मतदार यादीतील नावासोबत मोबाइल क्रमांक जोडल्याने निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या विविध सूचना आणि माहिती नागरिकांना आपल्या मोबाईलवर मिळणे शक्य होणार आहे.

आपला मोबाइल क्रमांक अद्ययावत केल्यास निवडणूक आयोगाच्या electoralsearch.eci.gov.in या संकेतस्थळाद्वारे, तसेच Voter Helpline मोबाइल ॲपद्वारे मतदार यादीतील आपल्या नावाचा सुलभतेने शोध घेता येतो. ई – मतदार ओळखपत्र डाऊनलोड करता येते. पूर्वी मतदार नोंदणी व इतर सेवा ऑफलाईन स्वरुपाच्या होत्या. त्यामुळे बहुतांश मतदार ओळखपत्रधारकाचे मोबाइल क्रमांक जोडलेले नाहीत. त्यामुळे मोबाइल क्रमांक जोडण्याची आवश्यकता आहे. एका मोबाइल क्रमांकाचा वापर फक्त एकाच मतदार ओळखपत्रासाठी करावा, असेही आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

Protected Content