जळगाव (प्रतिनिधी) भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा निवडणूकीसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरु आहे. निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत विविध प्रक्रीया पार पाडल्या जात आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनास प्राप्त झालेल्या ईव्हीएम यंत्राची सरमिसळ करुन यादृच्छिक (रॅंडम) पद्धतीने मतदार संघनिहाय विभागणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली आज करण्यात आली.
यावेळी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) किरण सावंत पाटील, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी प्रमोद बोरोले, तहसिलदार (निवडणूक) बाबासाहेब गाढवे, नायब तहसीलदार विकास लाडवंजारी यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्ह्यात अकरा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. त्यानुसार ईव्हीएम व व्हीव्हीपॅट या यंत्राची सरमिसळ करुन मतदारसंघ निहाय विभागणी करण्यात आली. यावेळी संगणकीय सादरीकरणाद्वारे यंत्रांची माहिती संबंधित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना दाखविण्यात आली.
प्रत्येक निवडणूकीत यादृच्छिकीकरणाची प्रक्रिया केली जाते. राजकीय पक्षाकडून ईव्हीएम यंत्राबाबत शंका उपस्थित केल्या जातात, या शंकाचे निरसण व्हावे व निवडणुकीत पारदर्शकता यावी यासाठी ही प्रक्रिया केली जाते. जळगाव जिल्ह्यास प्राप्त झालेल्या बीयु, सीयु आणि व्हीव्हीपॅट यांची विधानसभा मतदारसंघनिहाय वाटप प्रक्रिया सुरु झाली आहे.