Home Cities जळगाव जळगावात मतदार मॅपिंग मोहिमेला वेग ; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगावात मतदार मॅपिंग मोहिमेला वेग ; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जळगाव शहरात सुरू असलेल्या मतदार मॅपिंग मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून, आझाद नगर पिंप्राळा शिवारातील विशेष कॅम्पमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

शहरात दिनांक २२ मार्च ते २५ मार्च दरम्यान आयोजित या मोहिमेत मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी विविध प्रक्रिया राबवण्यात येत आहेत. यामध्ये मतदारांचे मॅपिंग, ब्लर फोटो दुरुस्ती, तसेच DSE संबंधित कामे समाविष्ट असून, शहरातील बीएलओमार्फत घरोघरी जाऊन ही प्रक्रिया पार पाडली जात आहे. या उपक्रमाचे मार्गदर्शन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, तहसीलदार शितल राजपूत, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी रूपाली काळे आणि निवडणूक नायब तहसीलदार नवीन भावसार करत आहेत.

या मोहिमेचा भाग म्हणून आझाद हिंद बहुउद्देशीय संस्थेमार्फत आझाद नगर पिंप्राळा शिवारातील चिस्तिया मस्जिद परिसरात विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पमध्ये स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आपल्या नोंदी दुरुस्त करून घेतल्या. विशेषतः युवक आणि नवमतदारांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावल्याचे दिसून आले.

कॅम्पदरम्यान सुपरवायझर क्रमांक ३६ योगेश भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली बीएलओ महेंद्र पारधी, नितीन वंजारी, सुभाष पाटील, विलास पाटील, प्रभाकर खराटे, तोसिफ शेख, संजय सपकाळे, पराग चौधरी, हिमतराव ढवळे, सुरेश न्हावी आणि पांडुरंग रानावडे यांनी नागरिकांच्या नोंदी अद्ययावत करण्याचे काम प्रभावीपणे पार पाडले. त्यांच्या समन्वयामुळे कॅम्पमध्ये कामकाज सुरळीतपणे पार पडले.

आझाद हिंद बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष फिरोज शेख, सचिव मोहम्मद नूर पठाण, खजिनदार मुदस्सर शेख, तसेच नासिर मणियार आणि मेहमूद पिंजारी यांनी कॅम्पच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या प्रयत्नांमुळे परिसरातील अधिकाधिक नागरिकांपर्यंत या उपक्रमाची माहिती पोहोचली आणि सहभाग वाढला.

या उपक्रमामुळे मतदार याद्या अधिक अचूक आणि अद्ययावत होण्यास मदत होत असून, आगामी निवडणुकांसाठी प्रशासनाची तयारी अधिक भक्कम होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नागरिकांनीही अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन लोकशाही प्रक्रियेला बळकटी देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound