जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आगामी जळगाव महानगरपालिका निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांमध्ये फेरफार होऊ नये आणि लोकसभा-विधानसभा निवडणुकीतील मतदान केंद्रांशी सुसंगती राखण्यात यावी, अशी ठाम मागणी सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज सोनवणे यांनी केली आहे. त्यांनी या संदर्भात मुख्य निवडणूक आयुक्त, मुंबई तसेच जळगाव महानगरपालिका आयुक्तांना ईमेलद्वारे औपचारिक तक्रार सादर केली आहे.
मागील निवडणुकांच्या काळात मतदार याद्यांमध्ये प्रशासनाकडून फेरफार झाल्याचे अनेक उदाहरणे समोर आली होती. काही मतदारांची नावे त्यांच्या मूळ मतदान केंद्रांवरून चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या केंद्रांवर हलवण्यात आली होती. यामुळे अनेकांना आपले मतदान केंद्र गाठणे कठीण झाले आणि परिणामी ते मतदानापासून वंचित राहिले. आदर्श नगर आणि गणपती नगर परिसरातील मतदारांची नावे काशीबाई उखाजी कोल्हे शाळेच्या मतदान केंद्रावर हलवण्यात आली होती, जे त्यांच्या राहत्या भागापासून लांब आहे.

सन २०१८ च्या महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १४ मधील सुमारे १२०० मतदारांची नावे चुकीने प्रभाग क्रमांक १२ मध्ये नोंदवण्यात आली होती. त्यामुळे हे मतदार आपला मतदानाचा हक्क बजावू शकले नाहीत. या गंभीर चुकांमुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर सोनवणे यांनी यंदाच्या निवडणुकीत अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी निवडणूक आयोगाने आणि मनपा प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
सोनवणे यांनी म्हटले आहे की, “लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदारांची नावे ज्या मतदान केंद्रांवर होती, त्याच ठिकाणी ती नावे महानगरपालिका निवडणुकीत कायम ठेवावीत. मनपा प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांकडून जाणूनबुजून याद्यांमध्ये फेरफार केल्याच्या तक्रारी आहेत, त्यामुळे पारदर्शकतेसाठी नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.”
मतदार याद्या अचूक आणि निष्पक्ष राहिल्यास नागरिकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास वाढेल, असे सोनवणे यांनी नमूद केले आहे. त्यांनी मतदार यादी पारदर्शक, सुटसुटीत आणि सुसंगत ठेवण्यावर भर देत प्रशासनाला वेळेत पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.



