बोगस मतदानाच्या संशय घेत मतदाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण; पियुष पाटीलसह एकावर गुन्हा दाख

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग क्रमांक ५ मधील आर. आर. विद्यालय मतदान केंद्रावर गुरुवारी दुपारी खळबळजनक घटना घडली होती. बोगस मतदानाचा संशय घेऊन एका मतदाराला आणि त्याच्या सहकाऱ्याला मतदान करण्यापासून रोखत, त्यांना बेदम मारहाण करण्यात आले होते. याप्रकरणी पियुष नरेंद्र पाटील आणि रवी शिंदे यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी सुनील श्रीधर भंगाळे (रा. वाघळी, ता. चाळीसगाव, सध्या मुक्काम जळगाव) हे १५ जानेवारी रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास आपला सहकारी पराग पाटील याच्यासह मतदान केंद्र क्रमांक १८ वर मतदानासाठी गेले होते. मतदान केंद्राध्यक्षांनी त्यांची ओळख पटवून बोटाला शाई लावली होती. मात्र, त्याच वेळी तेथे असलेल्या पोलिंग एजंटने भंगाळे यांच्या आधार कार्डावर चाळीसगावचा पत्ता असल्याचे पाहून आक्षेप घेतला.
उमेदवाराकडून मारहाण आणि बदनामी :
पोलिंग एजंटने तात्काळ उमेदवार पियुष पाटील याला बोलावून घेतले. पियुष पाटील याने सुनील भंगाळे यांना गचांडी धरून केंद्राबाहेर काढले आणि ‘तू बोगस मतदार आहेस’ असे म्हणून त्यांच्या कमरेवर लाथ मारली. तसेच, सोबत असलेल्या रवी शिंदे याने भंगाळे यांच्या कानशिलात लगावून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या गोंधळामुळे भंगाळे आणि पराग पाटील हे दोघेही आपल्या घटनादत्त मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहिले.
सोशल मीडियावर बदनामीचा आरोप :
मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला असून, आपली ‘बोगस मतदार’ म्हणून बदनामी केल्याचेही फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी हस्तक्षेप करत सुनील भंगाळे यांना सुरक्षितपणे पोलीस ठाण्यात नेले. या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, जिल्हापेठ पोलीस पुढील तपास करत आहेत.



