जळगाव प्रतिनिधी । शहरातील प्रभाग क्रमांक आठमधील वाघुळदे नगरासह परिसराला आज महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या भागात गटारींसह अन्य समस्यांचा पाढा नागरिकांनी वाचल्यानंतर या समस्या तातडीने सोडविण्यात येतील अशी ग्वाही महापौर व उपमहापौरांनी दिली.
पहिल्याच पावसात शहरातील प्रभाग क्रमांक आठमधील वाघुळदे नगर आणि परिसरातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले. या भागातील गटारीची नियमीत सफाई होत नसल्यामुळे ही अडचण उदभवली. दरम्यान, नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आज महापौर जयश्री सुनील महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आज या भागाला भेट दिली. त्यांनी या परिसरातील रहिवासी स्त्री-पुरूषांकडून अडचणी जाणून घेतल्या. यात प्रामुख्याने गटारींची मुख्य समस्या आढळून आली. येथील गटारी तुंबलेल्या असल्यामुळे पावसाचे पाणी अनेकांच्या घरात शिरल्याने नागरिक त्रस्त झाल्याचे आढळून आले. तर येथे रस्ते नसून पथदिव्यांचीही अडचण येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. या परिसरामध्ये गटारींची सफाई होत नसून साफसफाई देखील वेळेवर करण्यात येत नसल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या.
याबाबत महापौरांनी या भागातील गटारींच्या कामांचे निर्देश संबंधीत विभागाला दिल्याचे सांगितले. तर उपमहापौर कुलभूषण पाटील म्हणाले की, या भागातील रस्ते हे पावसाळ्यानंतर होणार आहेत. तत्पूर्वी गटारींची नियमितपणे सफाई करण्यात येईल. अगदी दोन दिवसात या भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यासाठी आपण सोबत बांधकाम, आरोग्य आदी खात्यांचे अधिकारी आणि कर्मचार्यांना सोबत घेऊन आलो असून त्यांना योग्य ते निर्देश देण्यात आल्याची माहिती देखील उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी याप्रसंगी दिली. यात या परिसरामध्ये नियमितपणे साफ-सफाईदेखील करण्यात येणार असून याबाबतचे सफाई कर्मचार्यांना निर्देश दिल्याचेही ते म्हणाले.