विश्रामगृहात राहून घरभाडे भत्ता घेणाऱ्या वीज अभियंत्यांचा गैरप्रकार उघड

MSEB

MSEB

जळगाव प्रतिनिधी । महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता फारुक शेख आणि मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी शासकीय विश्रामगृहात राहून शासनाकडून घरभाडे भत्ता घेतला असल्याचा प्रकार माहितीच्या आधिकारातून उघड झाला असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरीत खुलासा न दिल्यास आपण वरीष्ठांकडे तक्रार करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

याबाबत माहिती अशी की, जळगाव महावितरणचे अधीक्षक अभियंता फारुक शेख हे 1 जून 2018 पासून आणि मुख्य अभियंता दीपक कुमठेकर हे 4 जून 2018 पासून जळगाव महावितरण कार्यालयात कर्तव्यावर रुजू झाले आहेत. मात्र दोन्ही अधिकारी भाड्याच्या घरात राहत असल्याचे भासवून शासकीय विश्रामगृहात राहत आहेत. दोन्ही अधिकाऱ्यांनी महावितरण आणि शासनाची फसवणूक केली असल्याच्या जाणीवेतून सत्यतेच्या पळताळणीसाठी गुप्ता यांनी 6 मार्च 2019 रोजी माहितीचा अधिकारांतर्गत चौकशी केली असता त्यात सत्यता आढळून आली.

अधीक्षक अभियंता फारुख शेख यांनी 1 जुन 2018 रोजी पदभार घेतला. त्यांनी जुन ते नोव्हेबर 2018 या सहा महिन्यात 5 हजार 386 रूपयांप्रमाणे 32 हजार 316 तर डिसेंबर 2018 ते फेब्रुवारी 2019 अशा तीन महिन्या प्रत्येकी 5 हजार 557 प्रमाणे 16 हजार 671 असे एकुण 48 हजार 987 रूपये गेल्या नऊ महिन्यात घेतले असल्याचे मिळालेल्या माहितीतून उघड झाले आहे. महितीची मागणी गुप्ता यांनी केल्यानंतर फारुख शेख यांनी सात महिन्याचे भाडे परत केले आहे, तरीही अद्याप दोन महिन्याचे पैसे बाकी असल्याचे गुप्ता यांचे म्हणणे आहे. संबंधित दोघा अधिकाऱ्‍यांनी या संदर्भात विश्वासार्ह असा खुलासा द्यावा, अन्यथा याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचा इशारा गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

Add Comment

Protected Content