मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । इंग्लंडची राजधानी लंडन लवकरच भक्तिभावाने न्हाऊन निघणार आहे! वारकरी संप्रदायाच्या तेजस्वी परंपरेचा जागतिक झेंडा फडकवण्यासाठी ‘विठ्ठल-रुक्माई मंदिर इंग्लंड जिव्हाळा परिवार’तर्फे लंडनमध्ये एक अद्वितीय आणि ऐतिहासिक कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार आणि संत मुक्ताईचे सेवक ह.भ.प. विशाल महाराज खोले यांच्या कीर्तनातून विठ्ठलनामाचा गजर इंग्लंडभर घुमणार असून, मराठी संस्कृतीचा हा एक जागतिक सोहळा ठरणार आहे.
या कार्यक्रमात ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांचीही उपस्थिती राहणार आहे. दोन्ही कीर्तनकारांच्या संयुक्त वाणीतून संतविचार, वारकरी तत्त्वज्ञान आणि विठ्ठलभक्तीचा सुवास लंडनच्या भूमीत दरवळणार आहे. मराठी बांधवांच्या उपस्थितीत पार पडणारा हा सोहळा केवळ धार्मिक उत्सव नसून, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा आणि संतपरंपरेचा जागतिक प्रचार करणारा अध्यात्मिक महोत्सव ठरेल.

ह.भ.प. विशाल महाराज खोले यांनी एका साध्या ग्रामीण पार्श्वभूमीतून सुरुवात करून आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भक्ती, संस्कार आणि संतविचार रुजवले आहेत. त्यांच्या कीर्तनांमधून युवकांमध्ये नैतिकता, पालकप्रेम आणि अध्यात्माचे मूल्य जोपासले जाते. ‘पिंगळा महाद्वारी’ या त्यांच्या प्रसिद्ध भजनाने महाराष्ट्रभर भक्तीची लाट निर्माण केली होती. आता हीच भक्तीची लाट समुद्र ओलांडून लंडनमध्ये पोहोचत आहे.
या ऐतिहासिक सोहळ्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही विशेष शुभेच्छा संदेश दिला आहे. त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे —
“वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे. विठ्ठलनाम आणि संतविचारांचा जागतिक प्रसार होत आहे, ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. लंडनमध्ये होणाऱ्या या कीर्तन सोहळ्यास आणि ह.भ.प. विशाल महाराज खोले यांच्या सेवेला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!”
लंडनमधील मराठी बांधव आणि वारकरी भक्त या दिव्य क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. “पांडुरंगाचा जयघोष लंडनच्या आकाशात दुमदुमणार!” अशा भक्तिभावनेने भारलेली भावना सर्वत्र दिसून येत आहे.



