दिल्ली वृत्तसंस्था । सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन (कॅब) पुन्हा एकदा दिल्लीत हिंसाचार झालाय. दिल्लीतील सिलमपूर आणि जाफराबाद येथे पोलिस आणि निदर्शकांनी धुमाकूळ घातला. प्राप्त माहितीनुसार आंदोलनकर्त्यांनी बसवर दगडफेक करत तोडफोड केली. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव अनेक मेट्रो स्थानकांचे गेट बंद करण्यात आले आहेत. एएनआयने या संदर्भातील व्हिडिओ व्हायरल केला आहे.
आंदोलकांनी हिंसाचार करताना काही बसेसची तोडफोड करत आग लावली. निदर्शन सुरु असल्याने मेट्रोसहित अनेक ठिकाणी रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली होती. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सीलमपूर येथे लोक एकत्र आले होते. जवळपास १२ वाजण्याच्या सुमारास त्यांनी आंदोलानाला सुरुवात केली. यावेळी कॅब आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीविरोधात (एनआरसी) घोषणा देण्यात आल्या. एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, अत्यंत शांतपणे निदर्शन सुरु होतं. मात्र काही वेळाने हिंसाचार सुरु झाला. हिंसाचार सुरु झाल्यानंतर अनेक मेट्रो स्थानकांचे गेट बंद करण्यात आले होते. यावेळी कोणतीही मेट्रो स्थानकांवर थांबवण्यात येत नव्हती. परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचं पोलीस सांगत असून मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.