भडगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाच्या भडगाव तालुक्यात आज एक महत्त्वाचा राजकीय बदल पाहायला मिळाला आहे. पळासखेळे गावातील निष्ठावंत व जुझारू कार्यकर्ते विनोद देविदास नेरकर यांची भडगाव तालुकाध्यक्ष (मंडल अध्यक्ष) पदी नियुक्ती जाहीर करण्यात आली असून, या निर्णयामुळे तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही नियुक्ती २२ ऑगस्ट २०२५ रोजी अधिकृतपणे घोषित करण्यात आली असून ती तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे.

या नियुक्तीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, तसेच जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीष महाजन यांचे आदेश लाभले असून, प्रदेश महामंत्री विजय चौधरी व प्रदेश मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. नियुक्तीपत्र जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी प्रदान केले असून, नवनियुक्त अध्यक्ष विनोद नेरकर यांना पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली आहे.

या प्रसंगी भाजप नेते व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नेरकर यांचे स्वागत केले. खा. स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण, ना. संजय सावकारे, आ. राजुमामा भोळे, आ. अमोल जावळे, निवडणूक प्रमुख अमोल शिंदे, माजी आ. दिलीप वाघ, माजी तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, जिल्हा उपाध्यक्षा नूतन पाटील, जिल्हा चिटणीस प्रमोद पाटील, व इतर अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. विविध आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष व युवा मोर्च्याचे पदाधिकारी यांच्यासह अनेकांनी नेरकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विनोद नेरकर यांनी आपल्या नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे जास्तीत जास्त कार्यकर्ते निवडून यावेत यासाठी मी अहोरात्र मेहनत घेईन. ना. गिरीष महाजन, आ. मंगेश चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी आणि निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरवीन.” नेरकर हे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाशी निष्ठेने कार्यरत असून, स्थानिक पातळीवर त्यांनी मजबूत संघटन उभारण्याचे काम केले आहे.



