अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गेल्या दोन महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या अमळनेर तालुका पोलीस पाटील संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अखेर लोकशाही मार्गाने तोडगा निघाला असून, माजी सैनिक विनोद शालिग्राम बोरसे यांनी ६४ मते मिळवत स्पष्ट बहुमताने विजय मिळवला. ही निवडणूक पारदर्शक वातावरणात पार पडली असून, संपूर्ण प्रक्रियेस राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली.
दि. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी अमळनेर येथील श्री मंगळ ग्रह मंदिराच्या परिसरात जिल्हा आढावा बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक पार पडली. गेल्या काही महिन्यांपासून संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदावरून मतभेद निर्माण झाले होते. वेळोवेळी बैठका घेऊनही एकमत न झाल्यामुळे निवडणुकीद्वारे निर्णय घेण्याचा मार्ग स्वीकारण्यात आला. या निवडणुकीत तालुक्यातील सर्व पोलीस पाटील बांधव आणि भगिनींनी मोठ्या उत्साहात मतदानाचा हक्क बजावला.

संघटनेचे जिल्हा सचिव श्री. लखीचंद रमेश पाटील आणि विनोद शालिग्राम बोरसे यांच्यात सरळ लढत झाली. बोरसे यांनी ६४ मते मिळवत लखीचंद पाटील (५४ मते) यांचा पराभव केला. बोरसे हे सध्या सात्री गावचे पोलीस पाटील असून, माजी सैनिक देखील आहेत. त्यांच्या अनुभव व सेवाभावाचा विचार करता अनेकांनी त्यांच्याच नावावर विश्वास दाखवला.
या निवडणुकीत पोलीस पाटील गावकामगार संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब बाजीराव शिंदे, राज्यउपाध्यक्ष ज्ञानेश्वरजी महाजन, राज्यसंघटक भाऊसाहेब पाटील, निळकंठजी थोरात, साहेबरावजी राळे पाटील, महिला आघाडी अध्यक्षा तृप्तीताई मांडेकर, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष रोहिणीताई हांडे पाटील, महिला राज्य सदस्य लीलाताई पाटील, जळगाव जिल्हाध्यक्ष नरेंद्रजी शिंदे, धुळे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, तसेच तालुक्यातील अनेक ज्येष्ठ पोलीस पाटील, पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
विजयानंतर लगेचच राज्याध्यक्षांच्या उपस्थितीत श्री. विनोद बोरसे यांना तालुकाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले. यावेळी संघटनेच्या नियमांनुसार सनद प्रदान समारंभ पार पडला. बोरसे यांनी सांगितले की, लवकरच तालुक्यातील उर्वरित कार्यकारिणीची घोषणा करण्यात येणार असून, ती देखील सर्व पोलीस पाटील बांधवांच्या सहकार्यानेच पूर्ण केली जाईल.
या निवडणुकीनंतर तालुक्यातील व राज्यातील अनेक पोलीस पाटील बांधव, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी नव्या तालुकाध्यक्ष विनोद बोरसे यांना शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. पारदर्शक निवडणूक प्रक्रियेमुळे संघटनेचा जनतेतील विश्वास अधिक बळकट झाल्याची प्रतिक्रियाही अनेकांनी व्यक्त केली.



