दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या ५० किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठून कुस्तीपटू विनेश फोगटने विक्रम प्रस्थापित केला होता. पण दुर्दैवाने वजन वाढल्यामुळे तिला अंतिम सामन्यातून बाद करण्यात आले. त्यानंतर देशात परतलेली विनेश आता आखाड्याबाहेर समाजकारणात सक्रिय झालेली दिसत आहे. विनेश फोगटने दिल्लीच्या शंभू सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. “तुमची मुलगी तुमच्याबरोबर आहे”, असा संदेश विनेशने यावेळी दिला. शंभू सीमेवरील आंदोलनाला आज २०० दिवस होत आहे. त्या पार्श्वभूमीवर विनेशने शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला.
१३ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांचा मोर्चा राजधानी दिल्लीकडे निघाला होता. मात्र पोलिसांनी शंभू सीमेवरच शेतकऱ्यांना रोखून धरले. त्यानंतर शेतकऱ्यांनी याठिकाणी आंदोलन सुरू केले. किमान आधारभूत किंमतीला कायदेशीर मान्यता मिळवून द्यावी, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
शंभू सीमेवर आल्यानंतर विनेश फोगट यांनी शेतकऱ्यांसमोर भाषण केले. तसेच मी शेतकरी कुटुंबात जन्माला आले, याचा मला अभिमान वाटतो, असेही त्या म्हणाल्या. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत त्यांची मुलगी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, असेही त्या म्हणाल्या. “मी शेतकरी कुटुंबात जन्मले याचा मला अभिमान वाटतो. आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कुणीही पुढे येणार नाही. आपल्यालाच आपली लढाई लढावी लागणार आहे. मी देवाकडे प्रार्थना करते की, तुमच्या मागण्या लवकरच पूर्ण व्हाव्यात”, असे विनेश फोगट म्हणाल्या.