जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा पहिला ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी गौरव पुरस्कार’ वर्डी, ता. चोपडा येथील विमलबाई भिल यांना जाहीर झाला आहे. वर्डी शिवारात झालेल्या विमान अपघातात जखमी तरूणीसाठी अंगावरची साडी सोडून त्याची झोळी बनवून रूग्णवाहिकेपर्यंत पोहचविण्यासाठी मदत करून मानवतेचा आदर्श घालून दिल्याबद्दल हा पुरस्कार देवून त्यांचा विद्यापीठाच्या वतीने त्यांचा ११ ऑगस्ट रोजी सन्मान करण्यात येणार आहे.
विद्यापीठाच्या वतीने यावर्षीपासून कवयित्री बहिणाबाई चौधरी गौरव पुरस्कार दिला जाणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली होती. १६ जुलै, २०२१ रोजी एमव्हीकेएम संस्थे अंतर्गत शिरपूर येथे सुरू असलेल्या विमान प्रशिक्षण केंद्रामधील प्रशिक्षणार्थी विमान चोपडा तालुक्यातील वर्डी शिवारात कोसळले होते. या दुर्घटनेत वैमानिकाचा मृत्यू झाला. तर प्रशिक्षणार्थी वैमानिक अंशिका गुर्जर ही जखमी झाली. ५० फुट खोल दरीत हे विमान कोसळले डोंगराळ भाग असल्यामुळे रूग्णवाहिका घटनास्थळापर्यंत पोहचू शकत नव्हती. आदिवसाी बांधवांनी विमानाची काच फोडून या तरूणीला बाहेर काढले यावेळी ३ कि.मी. लांबवर असलेल्या रूग्णवाहिकेजवळ तिला तात्काळ नेण्यासाठी स्ट्रेचर उपलब्ध नसल्यामुळे विमलबाई भिल यांनी तात्काळ अंगावरची साडी काढून त्याची झोळी तयार करण्यासाठी दिली. त्यामुळे तात्काळ रूग्णवाहिकेजवळ आणून इस्पितळात दाखल करता आले व या तरूणीचा प्राण वाचला. या घटनेत विमलबाई भिल यांनी प्रसंगावधान दाखवत मानवतेचा आदर्श घालून दिल्याबद्दल प्रभारी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्याचे ठरविले आहे.
११ हजार रूपये, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आणि साडी- चोळी देवून हा पुरस्कार दिला जाणार आहे. यावेळी विमलबाई भिल यांच्या सोबत अपघातस्थळी मदत करणाऱ्या ११ तरूणांचादेखील स्मृतीचिन्ह देवून सत्कार केला जाणार आहे. ११ ऑगस्ट रोजी विद्यापीठाच्या नामविस्तार सोहळ्या निमित्त होणाऱ्या कार्यगौरव पुरस्कार सोहळयात विमलबाई भिल यांना हा पुरस्कार पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दिला जाणार आहे. अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन राहणार आहेत.