यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील डोंगर कठोरा गावात पावसाअभावी गंभीर स्थिती निर्माण झाल्याने गावकऱ्यांनी श्रद्धेचा अनोखा मार्ग स्वीकारत देवाकडे साकडे घालण्यासाठी पारंपरिक दिंडी सोहळ्याचे आयोजन केले. श्री पंचवटी विठ्ठल मंदिराच्या वतीने, श्री गढीवरील विठ्ठल मंदिर आणि संपूर्ण गावकऱ्यांच्या सहकार्याने, तसेच दिंडी प्रमुख रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला.

पावसाअभावी परिसरातील खरीप हंगाम संकटात सापडला असून गेल्या २०-२५ दिवसांपासून समाधानकारक पावसाचा एक थेंबही न पडल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे पिके कोमजण्यास सुरुवात झाली असून, उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी सामूहिक भावनेने एकत्र येत वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी धार्मिक श्रद्धेचे दर्शन घडविले.

दि. ७ ऑगस्ट रोजी गुरुवारी सकाळी श्री महादेव मारोती मंदिरापासून दिंडीची सुरुवात झाली. संपूर्ण गावातून प्रदक्षिणा घेऊन ही दिंडी डोंगर कठोरा येथून जवळच्या श्रीक्षेत्र डोंगरदा पर्यंत पायी मार्गक्रमण करत गेली. या ५ किलोमीटर अंतराच्या मार्गात भाविकांनी टाळ-मृदंगासह हरिपाठाचा गजर करत भक्तिभावाने सहभाग घेतला. डोंगरदा येथील पवित्र पायविहिरीवरून कावडीत पाणी आणून ते श्री महादेव मारोती मंदिरातील शिवपिंडीवर जलाभिषेकासाठी वापरण्यात आले. या विशेष उपक्रमामुळे गावात अध्यात्मिक उर्जा आणि एकात्मतेचा अनुभव सर्वांनी घेतला.
सदर दिंडी सोहळ्यात गावातील पुरुष व महिला भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिंडी प्रमुख रवींद्र पाटील यांच्यासह दत्तात्रय गुरव, शालिक झोपे, दगडू पाटील, प्रकाश पाटील, दिनकर पाटील, धिरज भोळे, मधुकर पाटील, धर्मा बाऊस्कर, ज्ञानदेव पाटील, हेमंत सरोदे, संजय सरोदे, चांगदेव पाटील, डालू फेगडे, अशोक राणे, रामदास खडके, नारायण फेगडे, रेवानंद पाटील, अशोक गाजरे, पुष्पक मुऱ्हेकर आदींनी पुढाकार घेतला. त्याचबरोबर जयश्री पाटील, कांचन सरोदे, योगिता सरोदे, छाया भोळे, वंदना रडे, आरती पाटील, रेखा जावळे, छाया जंगले, उर्मिला पाटील, लतिका पाटील, लता भिरूड, कविता जंगले, कुसुम जंगले, रुपाली जावळे, लेखा भिरूड, मंगला खडसे या महिला भक्तांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
गेल्या काही वर्षांपासून हवामान बदलाच्या परिणामामुळे शेतकऱ्यांना पावसासाठी देवाच्या कृपेचीच आस राहिली आहे. त्यामुळे अशा प्रकारचे धार्मिक उपक्रम गावकऱ्यांसाठी केवळ श्रद्धेचे प्रतीक नसून, एकत्र येण्याचे आणि संकटातही आशावाद जपण्याचे माध्यम बनत आहेत.



