जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरणामुळे बाधित झालेल्या सात्री गावातील ग्रामस्थांनी पुनर्वसनाच्या मागणीसाठी १ जानेवारी पासून जळगाव येथील जी. एस. ग्राऊंडवर आमरण उपोषण सुरू केले आहे. गेली २३ वर्षे पुनर्वसनासाठी लढा देऊनही केवळ आश्वासने पदरी पडल्याने संतप्त ग्रामस्थांनी आता ‘निर्णय नाही, तर माघार नाही’ अशी भूमिका घेतली आहे. सोमवारी ५ जानेवारी रोजी आमरण उपोषणाचा पाचवा दिवस असून जोपर्यंत मागण्या पुर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
१९९९ मध्ये मंजूर झालेल्या पाडळसरे धरणाच्या बॅकवॉटरमुळे सात्री गाव पूर्णतः बुडीत क्षेत्रात आले आहे. २००३ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी पुनर्वसनाचे आदेश दिले होते, तर २००८ मध्ये १७५ घरांसाठी पर्यायी जमिनीचे भूसंपादन करून प्लॉट पाडण्यात आले. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्यक्ष प्लॉट वाटपाची प्रक्रिया रखडली आहे.

प्रशासकीय उदासीनता आणि नेत्यांचा विरोध ग्रामस्थांच्या दाव्यानुसार, मे २०२२ मध्ये तत्कालीन उपजिल्हाधिकाऱ्यांनी प्लॉट वाटपाचे आदेश दिले होते, परंतु स्थानिक आमदारांनी त्याला लेखी विरोध दर्शवला. त्यानंतर १४ ऑगस्ट २०२५ रोजी प्रांताधिकारी व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत प्लॉट वाटप करण्याचे लेखी आश्वासन दिले होते, जे अद्यापही हवेतच आहे. विशेष म्हणजे, १९ ऑक्टोबर २०२५ रोजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने अंमलबजावणीचे आदेश दिले होते, तरीही प्रशासनाकडून कोणतीही हालचाल झालेली नाही.
“मंत्री आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी आमची फसवणूक केली आहे,” असा आरोप सात्री येथील धरणग्रस्तांनी केला आहे. हक्काचे घर आणि जमीन मिळेपर्यंत हे उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.



