Home प्रशासन तहसील नित्कृष्ट जल जीवन मिशन कामावरून ग्रामस्थांचा संताप ; २ ऑक्टोबरपासून उपोषणाचा इशारा...

नित्कृष्ट जल जीवन मिशन कामावरून ग्रामस्थांचा संताप ; २ ऑक्टोबरपासून उपोषणाचा इशारा  

0
237


पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  खेडीढोक येथील जल जीवन मिशन योजनेच्या कामातील गंभीर त्रुटींमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, यासंदर्भात वेळोवेळी निवेदने देऊनही प्रशासनाकडून समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्यामुळे ग्रामस्थांनी थेट २ ऑक्टोबर २०२५ पासून पंचायत समिती कार्यालय पारोळा येथे उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

जल जीवन मिशन अंतर्गत खेडीढोक गावात सुमारे ९६०० मीटर लांबीची पाईपलाईन टाकण्यात आली आहे. मात्र, ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार संपूर्ण पाईपलाईन निकृष्ट दर्जाची असून ती अंदाजपत्रकानुसार करण्यात आलेली नाही. यामध्ये सर्वात गंभीर बाब म्हणजे पाईपलाईन ही पूर्णतः जमिनीवर टाकण्यात आली असून त्यामुळे वारंवार लिकेज होत आहे. परिणामी, गावाला पाण्याचा पुरवठा खंडित होत असून ग्रामस्थांचे मोठे नुकसान होत आहे.

या कामाविरोधात ग्रामस्थांनी वेळोवेळी गट विकास अधिकारी, पंचायत समिती पारोळा यांच्याकडे निवेदने सादर केली असून, प्रशासनाकडून देण्यात आलेले उत्तर अपुरे आणि अमान्य असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे. पाईपलाईन शेतातून घालण्यात यावी, तसेच संपूर्ण काम नव्याने व उच्च दर्जाचे करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास ग्रामस्थांनी २ ऑक्टोबर २०२५ रोजी पंचायत समिती कार्यालय पारोळा येथे उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे. तसेच त्यांनी जिल्हाधिकारी जळगाव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), तहसीलदार पारोळा आणि पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी यांना निवेदन पाठवून लक्ष वेधले आहे. निवेदनावर सरपंचासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

ग्रामस्थांच्या मागण्या रास्त असून, पाण्याच्या मूलभूत गरजांबाबत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा आता सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound