Home क्राईम जळगावातील गावठी हातभट्टी दारूच्या अड्डा उध्वस्त !

जळगावातील गावठी हातभट्टी दारूच्या अड्डा उध्वस्त !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कंजरवाडा येथे एमआयडीसी पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत गावठी हातभट्टी दारूचे सुमारे ३ हजार लिटर कच्चे रसायन नष्ट केले. सहायक पोलीस निरीक्षक गणेश वाघ यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली असून, काही आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.

पोलिसांना कंजरवाडा परिसरात मोठ्या प्रमाणावर हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक गणेश वाघ यांनी आपल्या पथकासह, ज्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील, किशोर निकुंभ, पोलीस नाईक आकाश राजपूत, रितेश वंजारी आणि कविता गवई यांचा समावेश होता, कंजरवाडा येथील बीट क्रमांक १ येथे सापळा रचला.

पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांना पाहून काही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. मात्र, पथकाने मोठ्या प्रमाणावर दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे अडीच ते तीन हजार लिटर कच्चे रसायन तसेच इतर संबंधित साहित्य जागेवरच नष्ट केले. या कारवाईमुळे अवैध दारू निर्मितीच्या रॅकेटला मोठा धक्का बसला आहे. या कारवाईदरम्यान, दोन ते तीन महिला आणि पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound