नाशिक, वृत्तसंस्था | ‘अहमदनगरमध्ये भाजपच्या झालेल्या पराभवाला काँग्रेसमधून आलेले माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील जबाबदार आहेत. ते ज्या पक्षात जातात, तिथे खोड्या करतात. त्या पक्षासाठी हानिकारक वातावरण निर्माण करतात,’ असा थेट आरोप माजी मंत्री व कर्जत-जामखेडचे भाजपचे पराभूत उमेदवार राम शिंदे यांनी केला आहे.
महाराष्ट्रातील विविध विभागांत भाजपच्या झालेल्या पराभवाची कारणमिमांसा करण्याचे काम सध्या सुरू आहे. उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी आमदार आशिष शेलार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यानुसार, आज त्यांनी नाशिक येथे बैठक घेऊन नगर जिल्ह्यातील पराभूत उमेवारांशी चर्चा केली व पराभवाची कारणे जाणून घेतली. या बैठकीला प्रा. राम शिंदे, शिवाजीराव कर्डिले, स्नेहलता कोल्हे आदी नेते उपस्थित होते. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना या तिघांनीही विखेंकडे बोट दाखवले. विशेषत: राम शिंदे यांनी अत्यंत परखड मत मांडले.
राम शिंदे म्हणाले, ‘नगरमध्ये भाजपचे पाच आमदार होते. विखे आणि पिचड आल्यानंतर ती संख्या सातवर गेली होती. त्यात आणखी वाढ होणे अपेक्षित होते. पण निवडणुकीनंतर ती तीनपर्यंतच मर्यादित राहिली. नगर जिल्ह्यातील जागा १२-० ने जिंकू असे विखे म्हणत होते. त्यांची काही फार ताकद होती, असे नाही. पण जी काही होती, त्याचा काहीही फायदा झालेला नाही. उलट अनेकांचा सूर त्यांच्या विरोधात आहे. ते जिथे जातात, तिथे वातावरण बिघडवतात.’ स्नेहलता कोल्हे यांनीही हाच सूर आळवला. विखेंनी एका मतदारसंघात स्वत:च्या मेव्हण्याला अपक्ष म्हणून उभे केले होते. पण त्यांचे डिपॉझिट जप्त झाले,’ असेही त्या म्हणाल्या. तर, मी या दोघांच्या मताशी सहमत आहे, असे शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले.