अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील कळमसरे शिक्षण प्रसारक संस्थेच्या शारदा माध्यमिक विद्यालय व एन. एम. कोठारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक तथा प्राचार्यपदी श्री. विकास प्रल्हाद महाजन यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यात आला. या निमित्ताने माळी समाज पंच मंडळ व समस्त माळी समाज बांधवांच्या वतीने श्रीराम मंदिरात सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमात श्री. विकास महाजन यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात शिस्तप्रिय, अभ्यासू आणि विद्यार्थ्यांच्या मनात आपुलकी निर्माण करणारे शिक्षक म्हणून त्यांची ओळख असून, त्यांच्या नेतृत्वाखाली शैक्षणिक गुणवत्ता अधिक उंचावेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या सत्कार समारंभास मुरलीधर चौधरी, सुदाम चौधरी, अशोक चौधरी, पत्रकार बाबुलाल पाटील, गजानन पाटील, नथु चौधरी, सुकदेव महाजन, नितीन चौधरी, पोलीस पाटील गोपाळ महाजन, विजय चौधरी, संजीव महाजन, चुनीलाल महाजन, कैलास महाजन, डॉ. कपिल महाजन, प्रदीप महाजन, दिनेश चौधरी, भालचंद्र चौधरी यांच्यासह माळी समाजातील अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. समाजबांधवांनी एकत्र येत शिक्षण क्षेत्रातील या यशाबद्दल समाधान व्यक्त केले.
सत्काराला उत्तर देताना मुख्याध्यापक विकास महाजन यांनी समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. समाजाने दिलेल्या प्रेम, विश्वास आणि पाठिंब्यामुळेच आजपर्यंतची वाटचाल शक्य झाली असून, समाजाचे ऋण फेडण्याची जाणीव मनात कायम ठेवून शैक्षणिक व सामाजिक कार्यातून उतराई होण्याचा प्रयत्न करेन, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शाळेच्या गुणवत्तावाढीसाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा संकल्पही त्यांनी यावेळी व्यक्त केला.



