अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कळमसरे शिक्षण प्रसारक संस्थेच्या शारदा माध्यमिक विद्यालय व एन. एम. कोठारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक तथा प्राचार्यपदी विकास प्रल्हाद महाजन यांची नियुक्ती करण्यात आली असून, या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे. त्यांच्या शैक्षणिक योगदानाची दखल घेत माळी समाज पंच मंडळ व समस्त माळी समाज बांधवांच्या वतीने श्रीराम मंदिर येथे त्यांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.

विकास महाजन हे शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष व विद्यार्थ्यांमध्ये विशेष लोकप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या अध्यापन शैलीमुळे तसेच शाळेतील शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांना दिलेल्या चालनेमुळे त्यांनी अल्पावधीतच विद्यार्थ्यांसह पालकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यांच्या या निवडीमुळे संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेत अधिक सकारात्मक बदल घडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

निवडीप्रसंगी झालेल्या सत्कार समारंभाला मुरलीधर चौधरी, सुदाम चौधरी, अशोक चौधरी, पत्रकार बाबुलाल पाटील, गजानन पाटील, नथु चौधरी, सुकदेव महाजन, नितीन चौधरी, पोलीस पाटील गोपाल महाजन, विजय चौधरी, संजीव महाजन, चुनीलाल महाजन, कैलास महाजन, डॉ. कपिल महाजन, प्रदीप महाजन, दिनेश चौधरी, भालचंद्र चौधरी यांच्यासह माळी समाजातील अनेक मान्यवर व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच श्री. महाजन यांच्या कार्यकौशल्याचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना मुख्याध्यापक विकास महाजन यांनी समाजाबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. समाज बांधवांच्या पाठिंब्यामुळेच आपली आजची वाटचाल शक्य झाली असून, आपण नेहमी समाजाच्या ऋणात राहू, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. समाजाचे काही देणे लागते, ही जाणीव मनात ठेवून त्या ऋणातून उतराई करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.



