Home आरोग्य मुंबई लोकलमध्ये व्हिडिओ कॉलवर बाळंतपण, विकास बेद्रेची धाडसी कृती

मुंबई लोकलमध्ये व्हिडिओ कॉलवर बाळंतपण, विकास बेद्रेची धाडसी कृती


मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । मध्यरात्री धावत्या लोकल ट्रेनमध्ये गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि काहीच क्षणात परिस्थिती जीवघेणी ठरू शकली असती. मात्र, विकास बेद्रे या सामान्य पण प्रसंगावधान राखणाऱ्या तरुणाने दाखवलेले धैर्य आणि संवेदनशीलता यामुळे एका नवजात बाळाचा जन्म सुखरूप पार पडला. ही घटना मुंबईतील राम मंदिर रेल्वे स्थानकावर सोमवारी रात्री १२.४० च्या सुमारास घडली.

ही गर्भवती महिला गोरेगावहून मुंबईकडे लोकलने प्रवास करत होती. प्रवासादरम्यान तिला अचानक तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि मदतीसाठी तिने आवाज दिला. यावेळी त्याच डब्यात प्रवास करणाऱ्या विकास दिलीप बेद्रे याने क्षणाचाही विलंब न करता ट्रेनची इमर्जन्सी चेन ओढली. ट्रेन थांबताच विकासने आजूबाजूच्या प्रवाशांची मदत घेऊन महिलेला जमेल तशी आरामदायक जागा मिळवून दिली आणि त्याच वेळी थेट डॉक्टर देविका देशमुख यांना व्हिडिओ कॉल केला.

डॉ. देशमुख यांनी परिस्थितीची गंभीरता समजून घेत, मध्यरात्री असूनही कॉल उचलून विकासला अत्यंत शांतपणे प्रसूतीची प्रक्रिया समजावून सांगितली. वैद्यकीय शिक्षणाचा कोणताही अनुभव नसतानाही विकासने डॉक्टरांच्या प्रत्येक सूचना काळजीपूर्वक ऐकून अंमलात आणल्या. त्याने प्रसंगावधान, संयम आणि धैर्य दाखवत संपूर्ण प्रसूती यशस्वीरित्या पार पाडली. काही वेळातच त्या महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला.

राम मंदिर स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर रात्री सव्वा एक वाजता बाळाच्या रडण्याचा आवाज घुमला आणि उपस्थित प्रवासी, महिला व रेल्वे कर्मचारी यांचे डोळे पाणावले. एक अशक्यप्राय प्रसंग अत्यंत संवेदनशीलतेने हाताळण्यात आला. बाळाच्या जन्मानंतर आई आणि नवजात बालिकेला तत्काळ रूग्णालयात हलवण्यात आले असून, दोघीही सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे.

या संपूर्ण प्रसंगाने ‘मुंबईकरांची माणुसकी’ पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. विकास बेद्रेने दाखवलेले धैर्य आणि डॉक्टर देविका देशमुख यांचे तात्काळ मार्गदर्शन यामुळे एका आईच्या आणि नवजात बाळाच्या जीवाला नवसंजीवनी मिळाली. ही घटना शहराच्या धकाधकीतही माणुसकीचा उजळलेला झरा ठरली आहे.


Protected Content

Play sound