करूर वृत्तसेवा । प्रसिद्ध अभिनेते व आता राजकारणात सक्रिय झालेले विजय थलपती यांच्या सभेला गर्दीचा महापूर उसळला आणि वातावरणाने भीषण वळण घेतले. करूर येथे झालेल्या या रॅलीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल २० जणांचा मृत्यू झाला असून, अनेक लोक बेहोश झाले आहेत. मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश असल्याचे वृत्त आहे.

कार्यक्रमाला अपेक्षेपेक्षा अधिक गर्दी झाल्याने विजय भाषण करत असतानाच उपस्थित लोकांनी एकमेकांना गाठत पुढे सरकण्याचा प्रयत्न केला. या गोंधळात काही लोकांना दम लागला तर काही जण बेशुद्ध पडले. घटनास्थळी एम्बुलन्स पोहोचण्यात विलंब झाल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली.

अपघाताचे गांभीर्य लक्षात घेत विजय यांनी तात्काळ आपले भाषण थांबवले व आयोजकांना उपस्थितांना पाणीपुरवठा करण्याचे आवाहन केले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेवर तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले. जिल्हाधिकारी तसेच आरोग्य विभागाला सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश देण्यात आले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन सतत प्रयत्नशील आहे.
या दुर्घटनेमुळे विजय यांच्या राजकीय प्रवासातील एका मोठ्या सभेला काळी छाया पडली आहे.



