जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव पोलीस दलाच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या ‘दक्षता’ पेट्रोलपंपावरील १ कोटी ३३ लाख रुपयांच्या मोठ्या आर्थिक अपहार प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेले पेट्रोलपंप व्यवस्थापक तथा पोलीस उपनिरीक्षक (PSI) वाल्मीक मधुकर वाघ हे अखेर पोलिसांसमोर शरण आले असून, पोलिसांनी त्यांना व त्यांचा मुलगा शेखर वाघ याला अटक केली आहे.
जळगाव पोलीस दलाच्या मानव संसाधन विभागामार्फत ‘दक्षता पेट्रोलपंप’ चालविला जातो. या पंपाच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांची आणि व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी पीएसआय वाल्मीक वाघ यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मात्र, ऑडिट आणि अंतर्गत तपासणी दरम्यान पेट्रोलपंपाच्या खात्यात मोठी तफावत आढळून आली. सखोल चौकशीअंती वाघ यांनी तब्बल १ कोटी ३३ लाख ७५२ रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पित्यासह मुलालाही बेड्या :
गुन्हा दाखल झाल्यापासून वाल्मीक वाघ आणि त्यांचा मुलगा शेखर वाघ हे दोघेही फरार होते. अखेर त्यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. या अपहारामध्ये मुलाचाही सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याने पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. त्यांना जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन्ही आरोपींना १३ मार्च म्हणजे चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
रक्कमेवरून आरोपीचा अजब दावा :
पोलिसी चौकशी दरम्यान वाल्मीक वाघ यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी १ कोटी ३३ लाखांचा अपहार नाकारला असून, आपण केवळ १० ते १५ लाख रुपयांचाच अपहार केल्याचे म्हटले आहे. मात्र, पोलीस रेकॉर्ड आणि तांत्रिक पुराव्यांनुसार ही रक्कम सव्वा कोटींच्या वर जात असल्याने पोलीस आता या रक्कमेचा नेमका विनियोग कुठे झाला, याचा सखोल तपास करत आहेत.



