जळगाव प्रतिनिधी । प्रभात कॉलनीतील विद्यानगरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून लाखो रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याबाबत रामानंद नगर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुध फेडरेशनचे सेवानिवृत्त कर्मचारी संतोष झिपरू पाटील (वय-56) रा. प्लॉट नंबर 27, विद्यानगर हे मुंबई येथे राहणारे दोन्ही मुलांकडे भेटण्यासाठी पत्नी मंगला पाटील सह गेल्या दहा ते बारा दिवसांपासून गेले होते. तर त्यांच्या घराच्या बाजूला लहान भाऊ प्रल्हाद झिपरू पाटील हे देखील नाशिक येथे त्यांच्या मुलाकडे भेटण्यासाठी गेले होते. याच प्लॉटमध्ये मोठा भाऊ अशोक पाटील हे दररोजप्रमाणे सकाळी फिरण्यासाठी बाहेर जात असतांना त्यांना घरांना लावलेले कुलूप तोडलेले दिसून आले. त्यांनी संतोष पाटील यांच्या घरात जाऊ पाहणी केली असता त्यांना घरातील दोन्ही कपाट अज्ञात चोरट्यांनी फोडून एक लाख रूपये रोख रकमेसह सोने चांदीच्या दागीने असे लाखो रूपयांचा ऐवज चोरून नेला. तर दुसरा भाऊ प्रल्हाद यांच्या घराच्या दरवाजा फोडण्याचा प्रयत्न केला. यात मात्र घराच्या दरवाजाला लॅच लॉक असल्याने दरवाजा उघडता आले नाही.
घटनास्थळी पोलीसांची धाव
अशोक पाटील यांनी लहान भाऊ संतोष आणि प्रल्हाद यांना फोन करून घरफोडी झाल्याची माहिती दिली. तर रामानंद नगर पोलीसांनी देखील कळविण्यात आले. पो.कॉ. संतोष पाटील आणि प्रशांत भदाणे यांची घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. या घटनेबाबत रामानंद नगर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.