मुंबई वृत्तसंस्था । विधानसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड आजकरण्यात आली. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या. देवेंद्र फडणवीस यांची अभ्यासू नेते अशी ओळख आहे. माजी मुख्यमंत्र्यांना आता थेट विरोधीपक्षनेतेपदाच्या भूमिकेत शिरावे लागणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 23 नोव्हेंबर रोजी अजित पवार यांच्याशी हातमिळवणी करत दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. परंतु अजित पवारांचे बंड शांत होताच त्यांनी आपल्या उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे बहुमताअभावी फडणवीस सरकार कोसळल्याने त्यांनीदेखील आपला राजीनामा दिला होता.
देवेंद्र फडणवीसांची कारकीर्द
देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या जनतेचे प्रतिनिधित्त्व करत असतानाच पक्षांतर्गत विविध स्तरांवर नेतृत्व केले. नागपूर महानगरपालिकेतून ते सलग दोनदा (1992 आणि 1997) निवडून आले. नागपूरचे महापौर पद त्यांनी भूषविलेले असून भारतातील आजवरचे दुसरे सर्वात तरुण महापौर अशी त्यांची ख्याती आहे. महापौरपदी पुन्हा निवडून येऊन महाराष्ट्रातून ‘मेअर इन काऊन्सिल’ चा मान मिळविणारे ते पहिलेच.
देवेंद्र फडणवीस हे अनुभवी लोकप्रतिनिधी असून राजकीय बुद्धिचातुर्य व कौशल्य यासाठी त्यांना विविध व्यासपीठांनी गौरवलेले आहे. त्यांच्या कार्य-कर्तृत्त्वाची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली गेलेली असून राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने दिला जाणारा ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तसेच जागतिक संसदीय फोरमच्या सचिवपदी ते कार्यरत आहेत.