जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात लोकसभा निवडणूकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणूकीसाठी वाहन अधिग्रहण आणि अन्य कामकाजासाठी या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे 22 आणि 23 एप्रिल, 2019 रोजी या कार्यालयातील बहुतांश अधिकारी व कर्मचारी निवडणूक कामकाजात व्यस्त असणार आहे. त्यामुळे यादिवशी शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी, अनुज्ञप्तीसाठी वाहन चालन चाचणी (ड्रायव्हिंग टेस्ट) आणि वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण, वाहनांची नोंदणी इ कामकाज होणार नाही. असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
सर्व नागरिक, वाहनधारक, अनुज्ञप्तीसाठी अर्ज केलेले अर्जदार व वाहन वितरक यांनी या दोन दिवस म्हणजे 22 व 23 एप्रिल, 2019 रोजी नोंदणीसाठी तारीख घेतलेल्या अर्जदार, वाहनमालक यांना 24 एप्रिल ते 30 एप्रिल, 2019 या कालावधीत त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी, कामकाजाच्या वेळेत उपस्थित राहुन त्यांचे कामकाज करुन घेता येईल, असेही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. पाटील यांनी कळविले आहे.