मुंबई प्रतिनिधी । शेतकरी आंदोलनात अफवा पसरवून जिओविरोधी वातावरण निर्मित करण्याचे काम व्होडाफोन-आयडिया आणि एयरटेल या कंपन्या करत असल्याचा आरोप जिओ कंपनीने केला आहे.
रिलायन्स जिओने ट्रायला पत्र पाठवून स्पर्धक कंपन्या व्होडाफोन आयडिया आणि एअरटेलविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. रिलायन्स जिओकडून दूरसंचार नियामक मंडळाला यासंबंधी पत्र पाठवण्यात आलं आहे. व्होडाफोन आयडिया आणि एअरटेल चुकीचा मार्ग स्वीकारत असून नव्या कृषी कायद्यांमुळे जिओचा फायदा होत असल्याची खोटी अफवा पसरवत असल्याचा आरोप रिलायन्स जिओकडून करण्यात आला आहे.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाला (ट्राय) पाठवलेल्या पत्रात जिओने स्पर्धक कंपन्याकडून वेगवेगळ्या मोहीम चालवल्या जात असल्याचा आरोप केला आहे. यामध्ये सांगण्यात आलं आहे. मोठ्या प्रमाणात ग्राहक नंबर पोर्ट करण्याची मागणी करत असून हे एकमेव कारण देत आहेत. त्यांची सेवेशी संबंधित किंवा इतर कोणतीही तक्रार नाही. जिओकडून याआधी अशाच पद्धतीचं एक पत्र लिहिण्यात आलं होतं. ज्यामध्ये शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाने अनैतिक पद्धतीने मोहिम चालवल्याचा आरोप करण्यात आला होता. याचा उल्लेखही या पत्रात आहे.
दरम्यान, जिओचे आरोप एअरटेल व व्होडोफोन आयडियाने फेटाळले असून नैतिकतेच्या आधारे आम्ही व्यवसाय करत असल्याचं म्हटलं आहे. मात्र शेतकरी आंदोलनात दूरसंचार कंपन्यांची स्पर्धा नवीन पातळीवर पोहचल्याचे या सर्व प्रकरणातून अधोरेखीत झाले आहे.