नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीची उद्या (गुरुवार) मतमोजणी करताना मतदानयंत्रांमधील मतांची मोजणी करण्याआधी व्हीव्हीपॅट पडताळणी केली जावी आणि यात एका जरी मतात तफावत आढळली, तर त्या विधानसभा क्षेत्रातील सर्व मतदानयंत्रांमधील मतांची व्हीव्हीपॅट पडताळणी करून नंतरच मतमोजणी सुरू केली जावी, अशी मागणी २२ विरोधी पक्षांनी मंगळवारी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
२२ विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाला सांगितले की, मतमोजणीच्या सुरुवातीला प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी पाच मतदान केंद्रांतील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यांची जुळणी करावी. समजा त्यात काही गैर आढळले तर त्या विधासभा मतदारसंघातील सर्व केंद्रातील मतांची जुळणी करावी. देशातील अनेक भागांतील ईव्हीएम अदलाबदलीच्या दाव्यांबाबत आयोगाने स्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली. ईव्हीएमच्या अदलाबदलीचे तसेच त्यात गडबड झाल्याचे दावे निवडणूक आयोगाने फेटाळून लावले. स्ट्राँग रूममध्ये ईव्हीएम सुरक्षित असल्याचे आयोगाने सांगितले. तत्पूर्वी काही तास आधीच सर्वोच्च न्यायालयाने सर्व ईव्हीएममधील डेटा व्हीव्हीपॅटशी जुळवण्याची मागणी फेटाळली होती. आयोगाकडे वरीलप्रमाणे मागणी केल्याचे काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले. अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, आम्ही सातत्याने आयोगाकडे हीच मागणी करीत आहोत. बुधवारी बैठक घेऊन यावर विचार करू, असे आयोगाने सांगितले. तृणमूलच्या शिष्टमंडळानेही आयोगाची भेट घेऊन भाजपने राज्यात घातलेल्या गोंधळाच्या तक्रारी केल्या आहेत. तर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ईव्हीएममधील गडबडीच्या वृत्तावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, आमच्या लोकशाहीच्या मूळ आधाराला आव्हान देणाऱ्या अटकळींना स्थान असू शकत नाही. जनादेश पवित्र आहे. तो सर्व प्रकारच्या संशयापासून मुक्त असावा.