
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात गोवंश वाहतूक करणाऱ्या संशयित वाहनावरून मोठा राडा झाल्याची घटना बुधवारी ४ मार्च रोजी पहाटे ४ वाजता घडली आहे. जळगाव शहरातील मास्टर कॉलनी परिसरात या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी झालेल्या दगडफेकीत वाहनांचे नुकसान झाले असून, दोन तरुण जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर पोलिसांना गोवंश वाहतूक करणाऱ्या एका संशयित वाहनाची माहिती मिळाली होती. पोलिसांनी या वाहनाचा अमळनेरपासून जळगावपर्यंत थरारक पाठलाग केला. हे वाहन जळगाव शहरातील आकाशवाणी चौक परिसरात आले असता, तेथील काही तरुणांनी देखील पोलिसांच्या मदतीसाठी या वाहनाचा पाठलाग सुरू केला. पहाटे चार वाजेच्या सुमारास संशयित वाहन मास्टर कॉलनी परिसरात शिरले आणि तिथेच परिस्थिती चिघळली.
दगडफेक आणि वाहनांची तोडफोड :
वाहन अडवल्यानंतर या परिसरात किरकोळ दगडफेक सुरू झाली. संतप्त जमावाकडून एका कारसह दोन दुचाकींची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली. दरम्यान, पहाटेच्या वेळी घटनास्थळी राहिलेल्या आपल्या दुचाकी घेण्यासाठी सकाळी गेलेल्या दोन तरुणांवर काही जणांनी हल्ला केला. या हल्ल्यात एका तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. दोन्ही जखमींना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची गर्दी :
या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी जिल्हा रुग्णालय आणि पोलीस ठाणे परिसरात मोठी गर्दी केली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी आणि संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला आहे. जळगाव एमआयडीसी पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.



