सातारा– लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। सातारा येथे होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी पार्किंगची व्यवस्था थेट शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीच्या जागेवर करण्यात आल्याने शेतकऱ्यांवर रस्त्यावर बसून भाजीपाला विकण्याची वेळ आली आहे. सातारा बाजार समिती, सातारा नगरपालिका आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त निर्णयामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. पार्किंगची व्यवस्था तातडीने इतरत्र करावी, अन्यथा साहित्य संमेलनाच्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांसह आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.

दिनांक १ ते ४ जानेवारी दरम्यान होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी सातारा बाजार समितीच्या जागेत पार्किंगचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे चार दिवस शेतकऱ्यांनी आपला नाशवंत शेतमाल कुठे आणि कसा विकायचा, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शेतमाल हा अत्यावश्यक सेवेत मोडत असताना त्याकडे दुर्लक्ष करून थेट भाजी मंडई बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पूर्वीच्या जागेत भाजी विक्रीस परवानगी द्यावी आणि कार्यक्रमासाठी लागणारे पार्किंग अन्य ठिकाणी हलवावे, अशी ठाम मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.

शेतकऱ्यांचे नुकसान करून साहित्य संमेलन भरवले जात असल्याचा आरोप करत, प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. वेळप्रसंगी सर्व शेतमाल साहित्य संमेलनाच्या थेट स्टेजवर विक्रीस घेऊन बसण्याचा टोकाचा पवित्रा घ्यावा लागेल, असेही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
सातारा बाजार समितीसमोरील मोकळ्या जागेत भरवली जाणारी भाजी मंडई कोणताही पर्याय न देता अचानक बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातून रोज पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत कडाक्याच्या थंडीत भाजी विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना उघड्यावर, रस्त्यावर बसून माल विकावा लागत आहे. अनेक शेतकरी कुटुंबांचा उदरनिर्वाह याच भाजी विक्रीवर अवलंबून असताना प्रशासनाच्या निर्णयामुळे त्यांची मोठी कोंडी झाली आहे.
‘जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना भिकाऱ्यासारखी वागणूक दिली जात आहे,’ अशी तीव्र नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या प्रकाराचा जाहीर निषेध करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अजय बर्गे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व पालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना तातडीने सन्मानजनक आणि कायमस्वरूपी पर्यायी जागा देण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने वेळीच तोडगा न काढल्यास आंदोलन अधिक उग्र होण्याची शक्यता असून, सातारा बाजार समिती, नगरपालिका व जिल्हा प्रशासन कोणती भूमिका घेतात याकडे शेतकरी व नागरिकांचे लक्ष लागले आहे.



