अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । संपूर्ण जगभरात ९ ऑगस्ट रोजी साजरा होणारा जागतिक आदिवासी क्रांती दिवस अमळनेर तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आदिवासी समाजाच्या गौरवशाली परंपरा, संस्कृती आणि इतिहासाचे स्मरण म्हणून आदिवासी क्रांती दल शाखेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वाजतगाजत मिरवणूक काढून पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर मिरवणुकीने राणी लक्ष्मी चौकातील हुतात्मा स्मारकाला अभिवादन केले. पुढे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आला. अमळनेर नगरपरिषद शेजारील क्रांतिवीर समशेरसिंग पारधी चौकात आदिवासी महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याव्यतिरिक्त, ग्रामीण रुग्णालय अमळनेर येथे डॉ. जी. एम. पाटील यांच्या उपस्थितीत रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.

या कार्यक्रमाला अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, प्रसिद्ध सर्जन डॉ. अनिल शिंदे, तालुकाध्यक्ष आप्पा दाभाडे, पत्रकार प्रवीण बैसाणे, गोरख साळुंखे, माजी नगरसेवक संजय पवार, अॅड. शेखर खैरनार, तात्या वैदू, दयाराम मोरे, प्रभाकर पारधी यांच्यासह अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी वक्त्यांनी आदिवासी समाजाच्या इतिहास, संघर्ष आणि हक्कांच्या लढ्याबाबत विचार मांडले. तसेच समाजाला एकजुटीने पुढे जाण्याचे आवाहनही करण्यात आले.



