
अमळनेर (प्रतिनिधी) अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज कोथळी (मुक्ताईनगर) येथे खासदार रक्षाताई खडसे यांची भेट घेतली. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने खा.खडसे यांच्या सोबत अंगणवाडी कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि गटप्रर्वतक यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली.
आज दि. 08 जून 2019 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास रावेर लोकसभा मतदार संघाच्या नवनिर्वाचित खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांची त्यांच्या कोथळी (मुक्ताईनगर) जि. जळगाव येथील निवासस्थानी संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेऊन अंगणवाडी कर्मचारी व आशा स्वयंसेविका आणि गटप्रर्वतक यांच्या प्रलंबित मागण्याबाबत सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतर दि.17 ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या लोकसभेच्या अधिवेशनात अंगणवाडी कर्मचारी, आशा स्वयंसेविका,गटप्रर्वतक यांच्या मागण्या सविस्तरपणे मांडून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल, असं आश्वासन खासदार रक्षाताई खडसे यांनी शिष्टमंडळाला दिले. या शिष्टमंडळात रावेर लोकसभा मतदारसंघातील संघटनेचे प्रतिनिधी सविता महाजन, चेतना गवळी, रेखा नेरकर, शोभा जावरे, शोभा गोरे, आशा पोहेकर, सरला कोलते, शकुंतला चौधरी, वैशाली निंभोरे, सुरेखा कोळी, सुरेखा, वैशाली कोळी महाजन. मंगला माळी, अलका खैरनार आदींचा समावेश होता. दरम्यान, लोकसभेत सलग दुसऱ्यांदा विजय मिळविल्याबद्दल पदाधिकाऱ्यांंनी रक्षाताई खडसे यांचा सत्कार देखील केला.