भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुदत उलटून गेल्यानंतरही ठेव परत न केल्यामुळे वरणगाव येथील चंद्रकांत हरी बढे पतसंस्थेचे तत्कालीन चेअरमन चंद्रकांत बढे यांच्यासह सात संचालकांना अटक करण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
वरणगाव येथे मुख्यालय असणार्या चंद्रकांत हरी बढे पतसंस्थेतील गैरव्यवहार हा आधी देखील प्रचंड गाजलेला आहे. यात संचालकांना आधीही कारागृहाची हवा खावी लागली होती. आता, पुन्हा एकदा नव्या प्रकरणामुळे ही पतपंस्था वादाच्या भोवर्यात सापडली आहे.
बुलढाणा येथील ठेविदाराने चंद्रकांत हरी बढे पतसंस्थेत २ लाख २० हजार रूपये ठेवीच्या स्वरूपात ठेवलेले होते. याची मुदत १९ ऑक्टोबर २०१३ रोजीच संपली होती. मात्र त्यांना आपली रक्कम परत मिळाली नाही. या प्रकरणी आधीच गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. यानंतर याच गुन्ह्यात चंद्रकांत हरी बढे पतसंस्थेचे तत्कालीन चेअरमन चंद्रकांत हरी बढे यांच्यासह राजेंद्र विश्वनाथ चौधरी, भागवत मुरलीधर पाटील, गोविंद ज्ञानेश्वर मांडवगणे, विजय गणपत वाघ, बळीराम केशव माळी आणि भिकू शंकर वंजारी या संचालकांना अटक करण्यात आली आहे. तर उर्वरित संचालक मात्र पसार झाले आहेत.
सदर कारवाई बुलढाणा येथील सीआयडी पथकाने केली. या पथकामध्ये उपविभागीय अधिकारी अनिल पवार व शीतल मदने यांच्यासह त्यांच्या सहकार्यांचा समावेश होता. या कारवाईमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडालेली आहे. यातून पतसंस्थेच्या गैरव्यवहाराचा मुद्दा पुन्हा एकदा तापल्याचे दिसून येत आहे.