Home Cities भुसावळ वरणगाव नगरपरिषद निवडणूक : यंत्रणा सज्ज ; ३१ मतदान केंद्रांकडे कर्मचारी रवाना

वरणगाव नगरपरिषद निवडणूक : यंत्रणा सज्ज ; ३१ मतदान केंद्रांकडे कर्मचारी रवाना


वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वरणगाव नगरपरिषद निवडणूक रविवारी पार पडणार असून, शहरभर निवडणुकीचे वातावरण चांगलेच रंगात आले आहे. मतदारांमध्ये उत्सुकता वाढत असताना प्रशासनाने संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची तयारी पूर्ण केल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे. मतदान सुरळीत आणि शांततेत व्हावे यासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम केल्याचे स्पष्ट दिसत आहे.

यंदाच्या निवडणुकीसाठी शहरात एकूण ३१ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक केंद्रावर पाच कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. आवश्यक मतदान साहित्याची तपासणी पूर्ण करून हे कर्मचारी आज आपल्या संबंधित केंद्रांकडे रवाना झाले. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची गडबड सुरू होती. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणा, मतदान यादी, सील, स्टॅम्प अशा सर्व साहित्याची काटेकोर तपासणी करण्यात आली. मतदारांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रत्येक केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

मतदान सुरळीत व्हावे यासाठी पोलिस विभागाकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील महत्त्वाच्या चौकांवर अतिरिक्त पोलिस तैनात करण्यात आले आहेत. महात्मा गांधी विद्यालय, सिद्धेश्वर नगर मराठी शाळा, नाथ शाळा, आदर्श शाळा, जिल्हा परिषद शाळा आणि अक्सा नगरातील जिल्हा परिषद उर्दू शाळा या मतदान केंद्रांवर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मुक्ताईनगर पोलिस उपविभागीय अधिकारी सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमित कुमार बागुल, पीएसआय मंगेश बेंडकोळी, पीएसआय इसमाईल शेख यांच्या नेतृत्वाखाली गृहरक्षक दलाचे ६२ कर्मचारी, ७९ पोलिस कर्मचारी, तीन अधिकारी आणि एसआरपीएफची एक सेक्शन तैनात करण्यात आली आहे.

दरम्यान, वार्ड क्रमांक १० (अ आणि क) येथील निवडणूक मात्र काही उमेदवारांनी न्यायालयीन लढत दिल्याने स्थगित करण्यात आली आहे. अचानक पुढे ढकललेल्या या निवडणुकीमुळे स्थानिक पातळीवर नाराजीचा सूर उमटत असून काही उमेदवारांचा निवडणुकीसाठी झालेला खर्च वाया जाण्याची चर्चा शहरात रंगली आहे. प्रशासनाकडून मात्र इतर सर्व वार्डांमध्ये निवडणूक निर्विघ्न पार पडावी यासाठी सर्व यंत्रणा तैनात केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

उद्या होणाऱ्या मतदानासाठी शहर सज्ज झाल्याने यावेळी चांगली मतदान टक्केवारी नोंदवली जाण्याची स्थानिक प्रशासनाला आशा आहे. शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने निवडणूक पार पडावी यासाठी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound