Home धर्म-समाज वाणी समाज संस्कृती महिला मंडळाचा हळदी-कुंकू समारंभ उत्साहात ; ३५० महिलांची लक्षणीय...

वाणी समाज संस्कृती महिला मंडळाचा हळदी-कुंकू समारंभ उत्साहात ; ३५० महिलांची लक्षणीय उपस्थिती


पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहरात लाडशाखीय वाणी समाज संस्कृती महिला मंडळाच्या वतीने पारंपरिक हळदी-कुंकू समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांचे जतन करत महिलांना एकत्र आणणारा हा कार्यक्रम महिलांमध्ये स्नेहभाव, आत्मविश्वास आणि सामाजिक बांधिलकी वाढवणारा ठरला.

कार्यक्रमाची सुरुवात सुनंदा शेंडे व हेमलता चांदवडे यांच्या गणेश वंदना गीताने झाली. त्यानंतर सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रमुख पाहुणे आणि उपस्थित महिलांच्या स्वागतासाठी सादर करण्यात आलेल्या स्वागत गीतामुळे कार्यक्रमाला मंगलमय वातावरण लाभले. धार्मिक वातावरण निर्माण करत दिपिका शेंडे व माधुरी अमृतकार यांनी रामरक्षा म्हटली, तर अर्चना मैंद व योगिता येवले यांनी श्रीरामाचे भक्तिगीत सादर केले. सर्व महिलांनी एकत्र येत रामनामाचा जप केल्याने कार्यक्रम अधिकच भावपूर्ण झाला.

या प्रसंगी वाणी समाजातील नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. निर्मलाताई अशोक वाणी यांचा सत्कार मंडळाच्या अध्यक्षा वर्षा पूरकर यांच्या हस्ते, वंदनाताई गोविंद शिरोळे यांचा सत्कार उपाध्यक्षा सौ. रुणल कोतकर यांनी केला. अमोल गोविंद शिरोळे यांचा सत्कार सचिव वर्षा कोठावदे यांनी, तर भूषण प्रकाश टिपरे यांचा सत्कार खजिनदार दिपिका शेंडे यांनी केला. यासोबतच वाणी समाज मंडळाचे अध्यक्ष विजय नावरकर, उपाध्यक्ष हेमकांत मुसळे तसेच संचालक शरद मेखे, दिपक पिंगळे व देविदास तिसे यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित सदस्यांनी मतदार व समाजाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व जनतेच्या कल्याणासाठी जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे कार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. त्यांच्या मनोगताने उपस्थितांमध्ये सकारात्मकतेचा संदेश पोहोचला.

यानंतर उषा शेंडे यांनी संक्रांतीवर आधारित पारंपरिक ओव्या सादर केल्या. उखाणे व प्रश्नमंजुषा कार्यक्रमात रुपाली शिरोळे व उषा शेंडे यांनी महिलांना विविध प्रश्न विचारून कार्यक्रमात चैतन्य आणले. साधना कोठावदे यांनी भोगी व संक्रांत सणाचे धार्मिक व सामाजिक महत्त्व विशद केले. हळदी-कुंकू वाण वाटपाची जबाबदारी सुनिता भामरे, विद्या येवले, शीतल टिपरे, वृषाली मालपुरे व ज्योती शिनकर यांनी समर्थपणे पार पाडली.

हळदी-कुंकू समारंभ हा केवळ धार्मिक परंपरा नसून महिलांच्या सबलीकरणासाठीही उपयुक्त असल्याचे या कार्यक्रमातून स्पष्ट झाले. तब्बल ३५० महिलांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची भव्यता वाढली. अशा उपक्रमांतून महिलांमध्ये आपुलकी, स्नेह आणि नव्या ज्ञानाची देवाणघेवाण होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. कार्यक्रमानंतर महिलांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे कार्यक्रमाची सांगता आनंददायी वातावरणात झाली.


Protected Content

Play sound