जळगाव प्रतिनिधी । लॉकडाऊन उघडण्यासह सार्वजनीक बससेवा चालू करण्याच्या मागणीसाठी आज येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे डफली बजाओ आंदोलन करण्यात आले.
केंद्र व राज्य सरकार लॉकडाऊन उठवायला तयार नसून ते काहीही सवलत द्यायला तयार नाहीत, याचा निषेध म्हणून तसेच एसटी सेवा व महानगरातील सार्वजनीक बससेवा सुरू झाल्याच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी राज्यभरात आज डफली बजाओ आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.
या अनुषंगाने आज जळगाव येथील नवीन बस स्थानकावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डफली बजाव आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन वंचीत आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे व त्यांच्या सहकार्यांनी केले. याप्रसंगी सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे यांच्यासह, पदाधिकारी यांना अटक करून सुटका करण्यात आली.
दरम्यान, सध्या बससेवा बंद असल्याने कामगारांची उपासमार होत आहे, तर दुसरीकडे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्यापही बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. या बससेवा तात्काळ सुरू करण्यात याव्यात या प्रमुख मागणीचे निवेदन एसटी महामंडळ विभागीय नियंत्रक यांना देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, महासचिव वैभव शिरतुरे, संपर्क प्रमुख आधार कांबळे, युवक महानगराध्यक्ष जितेंद्र केदार आदी पदाधिकारी उपस्थित होते.