अँटीजन टेस्ट केल्याशिवाय लसीकरण करू नये!

जळगाव – शहरातील सर्व लसीकरण केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. लसीकरण केंद्रच कोरोना हॉटस्पॉट ठरू पाहत आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक लसीकरण केंद्रावर नागरिकांची अँटीजन टेस्ट केल्याशिवाय त्यांना लस देण्यात येऊ नये अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी दिल्या.

 

जळगाव शहरातील लसीकरण केंद्राचे नियोजन करण्यासाठी आणि नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्याबाबत महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी मनपात वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी मनपा नगरसेवक ऍड.दिलीप पोकळे, चेतन सनकत, नवनाथ दारकुंडे, गजानन पाटील, मनपा वैद्यकीय अधिकारी राम रावलानी, डॉ.शिरीष ठुसे आदी उपस्थित होते.

 

लसींचा पुरवठा कमी होत असल्याने आपण योग्य रीतीने नियोजन करावे,  नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पाणी आणि ग्रीननेटची व्यवस्था करावी, रांग लावून टोकन सिस्टीमचा वापर करावा अशा सूचना महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी केल्या.

 

जळगावात १८ ते ४५ आणि ४५ वरील नागरिकांची लस घेण्यासाठी गर्दी वाढत आहे. शासनाकडून लस पुरवठा नियमीत होत असेल तर नवीन केंद्र सोमवारपासून सुरू करण्यात यावे. जेणेकरून नागरिकांची सोय होईल असे उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी सांगितले.

 

१८ ते ४५ वयोगट आणि ४५ वयोगटावरील नागरिकांची वेगवेगळी व्यवस्था करण्यात यावी. वेगवेगळे केंद्र निश्चित केल्यास नागरिकांची गर्दी होणार नाही अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी केल्या.

Protected Content