बगदाद, वृत्तसंस्था | अमेरिकेने सलग दुसऱ्या दिवशी इराकवर एअर स्ट्राईक केल्याची माहिती समोर आली आहे. या हवाई हल्ल्यात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. भारतीय वेळेनुसार शनिवारी बगदादजवळील ताजी रोजनजीक हा अमेरिकन हवाई दलाच्या विमानांनी हवाई हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी ब्रिटन आणि इटलीच्या सैन्याचे तळही असल्याचंही सांगण्यात येत आहे.
या हवाई हल्ल्यात दोन गाड्यांवर निशाणा साधण्यात आला. या गाड्यांमध्ये इराण समर्थक मिलिशिया हश्द अल-शाबीचे काही लोक असल्याचे म्हटले जात आहे. या गाडीत असलेल्या सहाही जणांचा मृत्यू झाला आहे. अद्याप त्यांची ओळख पटली नाही, असे इराक सरकारी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. समोर आलेल्या माहितीनुसार अमेरिकेने हा हल्ला हशद-अल-साबीच्या कमांडरला लक्ष्य करून केला होता. इराकमधील सरकारी माध्यमांनीही या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
हशद-अल-साबीला ‘पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्स’ (PMF) म्हणूनही ओखळले जाते. याच्याच ताफ्यावर हा हल्ला करण्यात आला. परंतु या ताफ्यात कोणताही सिनिअर कमांडर नव्हता. या हल्ल्यात काही डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची माहिती या संघटनेकडून देण्यात आली.या हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये डॉक्टरांचाही समावेश असल्याची माहिती अल जझिरा वाहिनीकडून देण्यात आली. तर या घटनेत अन्य तीन जण गंभीररित्या जखमी झाले असल्याची माहितीही समोर आली आहे. हा हल्ला ज्या ठिकाणी करण्यात आला त्या ठिकाणाहून काही अंतरावरच इटली आणि ब्रिटनच्या सैन्याचे तळ आहेत.
इराणचे टॉप कमांडर ठार
अमेरिकेने गुरुवारी रात्री इराकची राजधानी बगदादमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचा टॉप कमांडर मेजर जनरल कासिम सुलेमानी ठार झाला होता. कासिम सुलेमानी यांचा ताफा बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने जात असताना अमेरिकेकडून हवाई हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला असून हाशेद-अल-शबिबी फोर्सचे उपप्रमुख अबू मेहदी अल मुहांदिसही ठार झाल्याची माहिती समोर आली होती.
पश्चिम आशियात तणाव शक्य
गेल्या वर्षापासून अमेरिका आणि इराणमध्ये प्रचंड तणाव आहे. अमेरिकेने इराणवर अनेक निर्बंध आणले आहेत. या हल्ल्यानंतर पश्चिम आशियात तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अमेरिकेने हा हल्ला अशावेळी केला आहे जेव्हा बगदादमध्ये अमेरिकेच्या दूतावासावर इराण समर्थक मिलिशियाकडून नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला हल्ला करण्यात आला होता.
ट्रम्प यांना दिली होती धमकी
कासेम सुलेमानी यांना डोनाल्ड ट्रम्प यांचा विरोधक मानले जायचे. त्यांनी अनेकवेळा अमेरिकेला धमकी दिली होती. बगदादमध्ये अमेरिकेच्या दुतावासावर झालेल्या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला होता. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी ट्रम्प यांनी इशारा देत इराणला नुकसान सहन करावे लागेल, असे म्हटले होते. ट्रम्प यांच्या या इशाऱ्यानंतरच अमेरिकेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळेच आधीपासूनच तणावपूर्ण संबंध असणाऱ्या अमेरिका आणि इराणधील संबंध अजून बिघडणार हे नक्की मानले जात आहे.
इराणने केली प्रतिज्ञा?
कासिम सुलेमानी यांच्या मृत्यूनंतर आयातुल्ला खोमेनी यांनी काही टि्वटस केले आहेत. सुलेमानी यांना श्रद्धांजली वाहताना अमेरिकेला त्यांनी इशारा दिला आहे. “इतकी वर्ष त्यांनी अथक मेहनत घेतली. शहीद होणे हा एक पुरस्कार आहे” असे खोमेनी यांनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे. खोमेनी यांनी देशामध्ये तीन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.