तेहरान, वृत्तसेवा : पश्चिम आशियातील तणाव निवळण्याच्या दृष्टीने एक मोठी घडामोडी समोर आली असून, इराण आणि अमेरिका यांच्यात दोन आठवड्यांच्या द्विपक्षीय युद्धविरामावर सहमती झाली आहे. इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, या युद्धविरामाच्या काळात दोन्ही देशांमधील प्रत्यक्ष चर्चा शुक्रवार, १० एप्रिल रोजी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे सुरू होणार आहे.
इराणची सरकारी वृत्तवाहिनी ‘आयआरआयबी’ने बुधवारी परिषदेच्या हवाल्याने स्पष्ट केले की, अमेरिकेच्या भूमिकेबाबत अद्याप अविश्वास असला तरी, शांततेच्या प्रक्रियेसाठी इराणने चर्चेस तयारी दर्शवली आहे. ही चर्चा सुरुवातीला दोन आठवड्यांच्या कालावधीसाठी असेल आणि दोन्ही पक्षांच्या संमतीने हा काळ वाढवला जाऊ शकतो. या महत्त्वपूर्ण चर्चेसाठी पाकिस्तानने मध्यस्थी केली असून, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल असीम मुनीर यांचे या युद्धविराम प्रक्रियेत केलेल्या अथक प्रयत्नांबद्दल आभार मानले आहेत.
दुसरीकडे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा करत इराणने मांडलेला १० कलमी प्रस्ताव चर्चेसाठी ‘सक्षम आधार’ असल्याचे म्हटले आहे. या कराराचा भाग म्हणून, इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जहाजांच्या सुरक्षेची आणि मुक्त संचाराची हमी दिली आहे, तर अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीचा ताबा इराणकडे सोपवण्यास संमती दर्शवली आहे.

इराणने युद्ध संपवण्यासाठी ज्या १० प्रमुख अटी मांडल्या आहेत, त्यामध्ये अमेरिकेने इराणच्या युरेनियम संवर्धनाच्या कार्यक्रमाला मान्यता देणे, इराणवरील सर्व प्राथमिक आणि दुय्यम निर्बंध उठवणे, गोठवलेली इराणी मालमत्ता मुक्त करणे आणि पश्चिम आशियातून अमेरिकन सैन्य मागे घेणे यांसारख्या अटींचा समावेश आहे. मात्र, इराणने स्पष्ट केले आहे की चर्चेचा अर्थ युद्ध पूर्णपणे संपले असा होत नाही. चर्चेदरम्यान अमेरिकेने कोणतीही चूक केल्यास इराण पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देईल, असा इशाराही सुरक्षा परिषदेने दिला आहे. या दोन आठवड्यांच्या काळात संपूर्ण राष्ट्रीय ऐक्य राखण्याचे आवाहनही इराणी प्रशासनाने केले आहे.



