भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत अनेक महत्त्वाचे विषय मंजूर झाले असले तरी काही विषयांवरून तीव्र चर्चा आणि वाद पाहायला मिळाला. विशेषतः प्रभाग क्रमांक २२ मधील पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाईपलाईन टाकण्याच्या विषयावरून सभागृहात जोरदार खडाजंगी झाली, ज्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सभेदरम्यान भाजपचे गटनेते युवराज लोणारी यांनी प्रभाग क्रमांक २२ साठी तब्बल ४२ स्वतंत्र विषय मंजुरीसाठी मांडले. एवढ्या मोठ्या संख्येने विषय एकाच प्रभागासाठी आणल्याने इतर नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विरोधकांनी यावरून ‘लाडका नगरसेवक’ योजना राबवली जात आहे का, असा थेट सवाल उपस्थित केल्याने सभागृहात एकच खळबळ उडाली.

या मुद्द्यावर प्रभाग क्रमांक २२ चे नगरसेवक सचिन पाटील यांनी युवराज लोणारी यांच्यावर जोरदार टीका केली. लोणारींच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी विषयांच्या गरजेबाबत आक्षेप घेतला. दोन्ही नगरसेवकांमध्ये झालेल्या तीव्र शाब्दिक चकमकीमुळे सभागृहात वातावरण तापले आणि दोन्ही गट आमनेसामने आले.
वाद अधिक चिघळत गेल्यानंतर इतर नगरसेवकांनीही या चर्चेत उडी घेतली, त्यामुळे काही काळ सभेचे कामकाज थांबवावे लागले. वाढता तणाव लक्षात घेता नगरसेवक संतोष चौधरी यांनी मध्यस्थी करत परिस्थिती शांत केली, त्यानंतर सभेचे कामकाज पुन्हा सुरू झाले.
दरम्यान, उर्वरित विषयांच्या मंजुरीसंदर्भात भाजपच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांना लेखी पत्र सादर केले होते. या पत्राद्वारे काही विषयांना मंजुरी देण्याबाबत तसेच काही विषय नामंजूर करण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली होती. अनेक विषयांना मंजुरी मिळाली असली तरी प्रभाग क्रमांक २२ च्या ४२ विषयांवरून निर्माण झालेला वाद हा सभेचा केंद्रबिंदू ठरला.
या घटनेमुळे भुसावळ नगरपरिषदेतील राजकीय मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असून स्थानिक पातळीवर नगरसेवकांमधील तणाव अधिक तीव्र होत असल्याचे चित्र दिसत आहे. सभेनंतरही आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू असल्याची चर्चा आहे.
आजच्या सर्वसाधारण सभेला नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, उपनगराध्यक्षा शैलैजा नारखेडे, भाजपचे गटनेते युवराज लोणारी, मुख्याधिकारी विवेक धांडे यांच्यासह बहुसंख्य नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.



