रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यात अचानक आलेल्या अवकाळी पावसाने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र दणादाण उडाली आहे. काही वेळातच वातावरण बदलून जोरदार वारा व पावसाने थैमान घातल्याने नागरिकांसह शेतकरी वर्गाची मोठी धावपळ उडाली.

या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली असून, बुऱ्हाणपूर–अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर झाडे कोसळल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तसेच तालुक्यातील काही राज्य महामार्गांवरही झाडे पडल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

रावेर शहरासह खानापूर, पाल, रसलपूर, मोरगाव आदी गावांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी वीज खांब व वीज तारा कोसळल्याने रावेर शहर व परिसरातील वीजपुरवठा काही काळासाठी खंडित झाला होता. अचानक अंधार पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असून, विशेषतः ऐन काढणीच्या तोंडावर असलेल्या गहू पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. काढणीस तयार असलेले पीक पावसात भिजल्याने उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अचानक आलेल्या या संकटामुळे शेतकरी अक्षरशः हैराण झाले आहेत.
या संदर्भात तालुक्यातील नुकसानीबाबत आमदार अमोल जावळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, शेतकरी वर्गातून प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून योग्य ती मदत जाहीर करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
दरम्यान, तहसीलदार संजय तायडे यांनी सांगितले की, रावेर तालुक्यात झालेल्या नुकसानीकडे प्रशासनाचे लक्ष असून नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. उद्यापासून तात्काळ पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



