यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल येथील क्षत्रिय बडगुजर बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याला उत्साहपूर्ण प्रतिसाद लाभला. सुमाई मंगल कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात रावेर यावल मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सरस्वती माता आणि कुलदेवी चामुंडा मातेच्या पूजनानंतर सुरू झालेल्या या सोहळ्यात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुरेश शिवराम महाले (अध्यक्ष अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती) उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून अनिल दिगंबर बडगुजर (पोलीस उपअधीक्षक, फैजपूर), वसंत देवराम बडगुजर (उद्योजक, यावल), प्रा. डॉ. अविनाश योगराज बडगुजर, कैलास लक्ष्मण बडगुजर (उद्योजक, संभाजीनगर), प्रा. श्रीराम जानकीराम बडगुजर (अध्यक्ष, बडगुजर समाज, यावल), दिलीप काशिनाथ बडगुजर (उपाध्यक्ष) आणि अतुल रमेश बडगुजर (सचिव) हे मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात आमदार अमोल जावळे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना आर्टिफिशल आणि आर्टिफिशीयल इंटेलिजन्स (AI) विषयावर सविस्तर माहिती दिली. “AI हे भविष्यातील करिअरचं महत्त्वाचं साधन असून, शिक्षणाच्या माध्यमातून आपण समाजाची उन्नती करू शकतो,” असे सांगत त्यांनी समाजातील विद्यार्थ्यांना या क्षेत्रात पुढे येण्याचे आवाहन केले. तसेच बडगुजर समाजासाठी स्वतंत्र सभागृहासाठी मदतीची ग्वाही दिली.
अनिल दिगंबर बडगुजर यांनी समाजात वाचनालय, अभ्यासिका आणि ग्रंथालय स्थापन करून त्यातून प्रशासकीय अधिकारी घडवण्याचे आवाहन केले. तर प्रा. डॉ. अविनाश योगराज बडगुजर यांनी स्पर्धा परीक्षांचे महत्त्व सांगून, विद्यार्थ्यांनी लहान वयातच या परीक्षांची तयारी सुरू करावी असे मार्गदर्शन केले. कैलास बडगुजर यांनी व्यवसायातील विश्वास निर्मिती आणि प्रशिक्षण यांची सांगड घालण्याचे तंत्र विद्यार्थ्यांना शिकवले.
कार्यक्रमात समाजातील विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि प्रत्येकी ५०० रुपये रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. बडगुजर समाजाच्या वतीने आयोजित हा पहिलाच विद्यार्थी गौरव सोहळा असल्याने उपस्थितीत उत्साह ओसंडून वाहत होता. अध्यक्षीय भाषणात सुरेश महाले यांनी शिक्षण आणि अशिक्षणातील फरक समाजाला समजावून सांगत, “शिक्षण हेच एकमेव साधन आहे जे समाजाची आर्थिक, सामाजिक आणि वैचारिक प्रगती घडवते,” असे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नंदलाल सोनू बडगुजर यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती लता अविनाश बडगुजर यांनी केले. यावेळी संपूर्ण क्षत्रिय बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष मेहनत घेतली. भविष्यात अशा कार्यक्रमांची मालिका सुरू ठेवण्याची समाजबांधवांनी अपेक्षा व्यक्त केली.



