जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जय किसनवाडी येथील दुकानासमोर ठेवलेले ४० हजार रुपये किमतीचे ॲल्युमिनीयम केबलचे बंडल एका महिलेने चोरून नेल्याची घटना शनिवारी १५ मार्च रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी रविवारी १६ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता जळगाव शहर पोलिस ठाण्यात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जयकिसनवाडीमध्ये असलेल्या विशाखा इंटरप्रायजेस या दुकानाच्या कुंपनाच्या आत काही साहित्य ठेवलेले आहे. दुकान बंद असताना शनिवारी १५ मार्च रोजी पहाटे एक महिला तेथे आली व तिने ॲल्युमिनीयम केबलचे एक बंडल चोरून नेले. या दुकानावर काम करणारे कमलाकर मधुकर बऱ्हाटे (वय- ४८, रा. योगेश्वर नगर) हे दुकानावर आले त्या वेळी हा प्रकार समोर आला. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात एक महिला हे बंडल चोरून नेत असल्याचे दिसले. या प्रकरणी बऱ्हाटे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून रविवारी १६ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता शहर पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार सुनील पाटील करीत आहेत.