रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने फूस लावून पळवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना गावात उशिरा उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली असून, या प्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस तपासाची चक्रे फिरू लागली असून गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही घटना मंगळवारी दुपारी घडली. तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या पीडित अल्पवयीन मुलगी आणि तिची आई घराजवळ भांडी धुत होत्या. त्यावेळी आईने तिला गल्लीतील सार्वजनिक पाण्याच्या टॉकीवरून पिण्याचे पाणी आणायला सांगितले. मुलगी नेहमीप्रमाणे टाकीवर गेली, मात्र त्यानंतर ती परत आलीच नाही. बराच वेळ झाला तरी मुलगी न दिसल्याने आईने आसपास व नातेवाईकांकडे शोध घेतला, परंतु ती कुठेही सापडली नाही.

शेवटी या प्रकरणी मुलीच्या आईने रावेर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने अज्ञात इसमाविरोधात भारतीय दंड विधान कलम ३६३ नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
गावातील सीसीटीव्ही फुटेज, परिसरातील हालचाली आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलीस तपास करत आहेत. अपहरण करणाऱ्या व्यक्तीने पीडित मुलीला फूस लावून पळवून नेल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. संपूर्ण गावात या घटनेमुळे भयावह वातावरण निर्माण झाले असून, पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.



