मनोज जरांगेच्या घरावर अज्ञात ड्रोन; पोलिसांत तक्रार दाखल

आंतरवाली सराटी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटलांच्या आंतरवाली सराटी स्थित घरावर सोमवारी रात्री एका अज्ञात ड्रोनने घिरट्या घातल्या. यामुळे मनोज जरांगे यांची टेहळणी केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आंतरवालीच्या गावकऱ्यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

मनोज जरांगे पाटील सध्या आंतरवाली सराटीच्या सरपंचाच्या घरी मुक्कामी आहेत. सोमवारी मध्यरात्री त्यांचा मुक्का असलेल्या घरावर एक ड्रोन घिरट्या घालत असल्याचे दिसून आले. मनोज जरांगे यांनी स्वतः गच्चीवर जाऊन या ड्रोनची पाहणी केली. त्यानंतर ग्रामस्थांशी चर्चाही केली. या प्रकरणी आंतरवाली सराटीचे सरपंच तथा गावकऱ्यांनी पोलिसांकडे तोंडी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे पोलिस आज घटनास्थळी जाऊन पाहणी करणार आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे 4 दिवसांपूर्वीच अशाच एका ड्रोनने आंतरवालीवर घिरट्या घातल्या होत्या.

Protected Content