जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील पाथरी ग्रामपंचायत कार्यालयाजवळील डेअरीतील सामानाला अज्ञात व्यक्तीने पेटवून देवून सुमारे ५१ हजार रूपयांचे नुकसान केल्याची घटना २२ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीला आली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील पाथरी गावातील ग्रामपंचायत कार्यालयजवळ पाथरी सहकारी दूध उत्पादक सोसायटी अर्थात डेअरी आहे. या ठिकाणी गावातील सर्व शेतकरी बांधव गाई व म्हशीचे दूध देण्यासाठी येतात. दरम्यान २२ सप्टेंबर रोजीच्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने डेअरीच्या दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत डेअरीतील अनालाईझर मशीन इन्व्हर्टर बॅटरी, प्रिंटर, स्टेशनरी असा एकूण ५१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल असलेला पूर्ण सामान जाळून टाकून नुकसान केल्याची घटना २२सप्टेंबर रोजी ४ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. यासंदर्भात डेअरीचे सचिव शशिकांत शिवाजी बाविस्कर (वय-४६) रा. पाथरी यांनी एमआयडीसी पोलिसांना कळवून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून शशिकांत बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात नुकसान केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिश शेख करीत आहे.