जळगाव प्रतिनिधी । राज्यातील अकृषी विद्यापीठीय व अशासकीय अनुदानित महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्या सोडवाव्यात यासाठी दि. २४ सप्टेंबर, २०२० पासून सुरु केलेले लेखनी/ अवजार बंद व काम बंद आंदोलन गुरूवार १ ऑक्टोबर पासून तूर्त स्थगित केलेले असून मागण्यांची पूर्तता न झाल्यास १९ ऑक्टोबर पासून हे आंदोलन पुन्हा सुरु करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या आंदोलनाची दखल घेत २८ सप्टेंबर रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कृती समितीच्या प्रतिनिधीं समवेत ऑनलाईन चर्चा केली होती. या चर्चेच्या अनुषंगाने कृती समितीचे समन्वयक रमेश शिंदे यांच्या समवेत तीन वेळा भ्रमणध्वनी द्वारे चर्चा केली. नमूद दहा मागण्यांपैकी चार मागण्यांसह अन्य दोन मागण्यांची पूर्तता त्वरीत करण्याचे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांनी दिले आहे. तसे टि्वट समाज माध्यमांवर त्यांनी केले. सामंत हे स्वत: सध्या वैद्यकीय उपचार घेत आहेत. त्यांनी केलेल्या या विनंतीचा मान राखत सेवक कृती संयुक्त कृती समितीने हे आंदोलन तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. १७ ऑक्टोबर पर्यंत या प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास ते स्थगित आंदोलन सोमवार १९ ऑक्टोबर पासून पूर्ववत सुरु करण्यात येईल व राज्यातील अकृषी विद्यापीठ आणि अनुदानित अशासकीय महाविद्यालयात बेमुदत कामबंद आंदोलन केले जाईल असा इशारा कृती समितीने दिला आहे. तसे पत्र उदय सामंत यांना समितीच्या वतीने देण्यात आले असून या पत्रावर समन्वयक रमेश शिंदे व महाविद्यालयीन कर्मचारी महासंघाचे राज्याचे अध्यक्ष प्रकाश म्हसे व महासचिव रावसाहेब त्रिभुवन, मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष अभय राणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दरम्यान गुरुवारी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी या कृती समितीच्या आदेशान्वये आंदोलन तूर्त स्थगित केले असून कर्मचारी गुरूवारी कामावर परतले त्या आधी कर्मचाऱ्यांची द्वारसभा होऊन कृती समितीचा निर्णय प्रवर्तक अरूण सपकाळे यांनी जाहीर केला.यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजू सोनवणे, जयंत सोनवणे, सुभाष पवार, महेश पाटील, शिवाजी पाटील, शांताराम पाटील, ऑफीसर फोरमचे डॉ.एस.आर.भादलीकर, के.सी.पाटील आदी उपस्थित होते. विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा या आंदोलनाला ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनच्या जळगाव शाखेने पाठिंबा जाहीर केला. या पाठींबा पत्रावर अध्यक्ष रविंद्र बारेला, सचिव प्रकाश वसावे व सल्लागार जी.एन. पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.