जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गुढी पाडव्याच्या पारंपरिक उत्सवाला ज्ञानाची जोड देत धरणगाव तालुक्यातील लाडली येथील शिक्षक किरण विठ्ठल पाटील यांनी यंदा पुस्तकांच्या गुढीचे पूजन करून वाचनसंस्कृतीचा अनोखा संदेश दिला आहे. त्यांच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून विद्यार्थ्यांसाठी तो प्रेरणादायी ठरत आहे.
भगीरथ इंग्लिश स्कूलचे आदर्श शिक्षक म्हणून ओळख असलेल्या किरण पाटील यांनी गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर पारंपरिक गुढीऐवजी पुस्तकांची गुढी उभारली. ही गुढी ज्ञान, समृद्धी, वाचन जनजागृती आणि विज्ञाननिष्ठ विचारांचे प्रतीक म्हणून उभारण्यात आली. त्यांनी विविध संस्थांकडून मिळालेल्या सिंगापूर आंतरराष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार, महाराष्ट्ररत्न पुरस्कार, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच समाजभूषण पुरस्कारांच्या स्मरणार्थ मिळालेल्या सुमारे १५१ पुस्तकांचा उपयोग करून ही गुढी सजवली.

किरण पाटील हे केवळ शिक्षक म्हणूनच नव्हे तर समाजात वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि वाचनाची गोडी वाढावी या उद्देशाने त्यांनी आपल्या घरातच ही ‘पुस्तक गुढी’ उभारली आहे. याशिवाय त्यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ आजवर ५००० हून अधिक विविध विषयांवरील पुस्तके विद्यार्थ्यांना व वाचनप्रेमींना भेट दिली आहेत.
या उपक्रमात त्यांच्या कुटुंबियांचेही मोठे सहकार्य लाभले आहे. रंजना पाटील, अॅड. भरत पाटील, अॅड. वैशाली पाटील, प्रदीप पाटील, पवन पाटील, धिरज पाटील, नवल पाटील, कृतिका पाटील, विभा पाटील आणि आर्यराज पाटील यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. त्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम अधिक प्रभावीपणे साकार झाला.
गुढी पाडव्याच्या निमित्ताने अशा प्रकारे ज्ञानाची गुढी उभारून किरण पाटील यांनी समाजाला सकारात्मक आणि प्रबोधनात्मक संदेश दिला आहे. पारंपरिक सणांना आधुनिक विचारांची जोड देत वाचनसंस्कृती रुजवण्याचा त्यांचा हा प्रयत्न सर्वांसाठी अनुकरणीय ठरत आहे.



