
मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगरातील शैक्षणिक क्षेत्रात विशेष ठरलेला ‘युनिक बाल उत्सव 2026’ मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. लहानग्यांच्या कलागुणांना वाव देणारा हा सोहळा पालक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संस्मरणीय ठरला.

मुक्ताईनगरच्या पुण्यभूमीत वसलेल्या युनिक इंटरनॅशनल स्कूल येथे आयोजित या बालउत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती लाभली. त्यांच्या सोबत उपनगराध्यक्ष सौ. देवयानी शिरसाट, नगरसेवक व शिवसेना जिल्हा उपप्रमुख छोटू भोई, ॲड. अरविंद गोसावी, नगरसेवक बबलू कोळी, माजी नगरसेवक निलेश शिरसाट, असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर राजेंद्र चाटे, माजी नगरसेवक पियुष मोरे, प्राध्यापक शरद भालेराव, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. जयश्री मासुळे तसेच संस्थापक अध्यक्ष आत्माराम मासुळे यांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे लहानग्यांनी सादर केलेले ‘छावा’, ‘हनुमान चालीसा’, ‘झुलवा पाळणा’ यांसारखे सांस्कृतिक कार्यक्रम. भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवतानाच वेस्टर्न कल्चरचे सादरीकरण करत इतिहासाची झलकही विद्यार्थ्यांनी रंगमंचावर जिवंत केली. शौर्यगाथा, बलिदान आणि त्याग यांसारख्या मूल्यांचे महत्त्व बालवयातच रुजवण्यासाठी सादर करण्यात आलेल्या सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली.
विशेष म्हणजे, सादरीकरण करणारा हा बालगट इयत्ता पहिलीतही अद्याप दाखल नसताना त्यांनी दाखवलेला आत्मविश्वास आणि उत्कृष्ट परफॉर्मन्स यामुळे सर्वच मान्यवर भारावून गेले. कार्यक्रमाची रंगत इतकी प्रभावी होती की शेवटपर्यंत एकही पालक कार्यक्रमस्थळ सोडून गेला नाही. पालकांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादातून विद्यार्थ्यांच्या मेहनतीची आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाची पोचपावती मिळाली. पालकांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि आनंद या कार्यक्रमाच्या यशाची साक्ष देत होता.
यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे तोंडभरून कौतुक केले. संस्थापक अध्यक्ष आत्माराम मासुळे, मुख्याध्यापिका जयश्री मासुळे आणि संपूर्ण शिक्षकवर्गाच्या अथक परिश्रमांची प्रशंसा करत त्यांनी शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. इतर प्रमुख अतिथींनीही विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे आणि शाळेच्या शैक्षणिक दृष्टिकोनाचे गौरवोद्गार काढले.
संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सुप्रसिद्ध अँकर तुषार वाघुळदे यांनी केले. त्यांच्या उत्साही शैलीमुळे कार्यक्रमाला अधिक रंगत आली आणि उपस्थितांची दाद मिळाली.



