भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी l काल नेपाळमध्ये झालेल्या भीषण अपघातातील जखमींची विचारपूस करण्यासाठी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी आज २४ ऑगस्ट रोजी थेट नेपाळमध्ये धाव घेऊन त्यांची विचारपूस केली आहे.
काल नेपाळमधील काठमांडू आणि पोखरा शहराच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात २७ जणांचा मृत्यू झाला असून यातील २५ जण हे भुसावळ तालुक्यातील वरणगाव तळवेल व परिसरातील गावांचे नागरिक आहेत. काल ही बातमी येताच भुसावळ शहरासह संपूर्ण परिसर शोकाकुल झाला. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी फोनवरून जखमींची विचारपूस करून नंतर तेथील स्थानिक प्रशासनाला आवश्यक ती मदत करण्याची विनंती केली. यानंतर आमदार संजय सावकारे आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे हे दोन्ही मान्यवर तातडीने नेपाळला निघाले.
आज सकाळी ते नेपाळला पोहोचले असून त्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली. दरम्यान या अपघातात मृत्यू झालेले व्यक्तींचे शव आज सायंकाळपर्यंत त्यांच्या घरी पोहोचणार आहे. तर जखमींवर काठमांडू येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि आमदार संजय सावकारे यांनी स्थानिक प्रशासनातील उच्च अधिकारी यांची भेट घेऊन जखमी झालेल्यांवर आवश्यक ते वैद्यकीय उपचार करण्याचे सांगितले.